
पनवेल (प्रतिनिधी) इंडिया ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग कप ही प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच नवी दिल्ली येथे उत्साहात पार पडली. विविध देशांतील खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील केवाळे गावचा उदयोन्मुख खेळाडू रोणाल महेश पाटील याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन रौप्यपदके पटकावून पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
३२ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना रोणालने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये त्याने जिद्द, चिकाटी, शिस्तबद्ध सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी बजावत दुहेरी रौप्यपदके जिंकली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोणालच्या यशाचे मनःपूर्वक कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “रोणालसारखे खेळाडू पनवेलची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करत असून त्यांच्या कर्तृत्वामुळे भविष्यात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उंचावेल.
रोणालच्या यशामागे त्याचे मुख्य प्रशिक्षक निलेश भोसले, प्रशिक्षक योगेश बईकर तसेच संपूर्ण टीमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि प्रोत्साहनामुळे रोणालने हे यश संपादन केले.तसेच भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील आणि नगरसेवक अजय बहिरा यांनीही रोणालचे अभिनंदन करून त्याच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. रोणालच्या या यशामुळे पनवेल तालुक्यातील तरुणांमध्ये किकबॉक्सिंगसह इतर क्रीडा प्रकारांविषयी प्रेरणा निर्माण झाली असून भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




Be First to Comment