
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ मधील विविध नागरी समस्या व प्रलंबित कामांबाबत नगरसेविका सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून मा. आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांना लेखी निवेदन देत तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली आहे.
“ठाणा नाका सिग्नल वळण रस्ता रुंदीकरणाची मागणी”
गार्डन हॉटेल सिग्नल परिसर हा वाढत्या शहरी विकासामुळे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. हायवेला जोडणारा ठाणा नाका रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहने तसेच एनएमएमटी बसेसना वळण घेताना अडचणी निर्माण होत असून वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाणी दोन्ही बाजूंनी नियोजनबद्ध पद्धतीने रस्ता रुंदीकरण करून सुरक्षित व सुलभ वाहतुकीची व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“पाडा मोहल्ला व भुसार मोहल्ला येथील प्रलंबित नागरी कामे”
प्रभाग क्र. १८ मधील पाडा मोहल्ला व भुसार मोहल्ला परिसरात नालेसफाई,तुटलेली गटार दुरुस्ती, पेवर ब्लॉक बसवणे, आवश्यक त्या ठिकाणी काँक्रिटीकरण आदी कामे असून नागरिकांकडून त्याबद्दल तक्रार प्राप्त होत आहेत.
याकूब बेग हायस्कूल ते कच्छी मोहल्ला दरम्यान नाला, स्वच्छ करून नव्याने बांधकाम करून आवश्यक त्या ठिकाणी स्लॅब करणे, अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक/काँक्रिटीकरण, सार्वजनिक शौचालयाची ड्रेनेज लाईन दुरुस्ती, तुटलेली गटारे व चेंबर दुरुस्ती, संपूर्ण प्रभागातील नालेसफाई करण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
“महर्षी वाल्मिकी नगर येथे पाहणी दौरा”
महर्षी वाल्मिकी नगर येथे नगरसेविका सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी पाणीपुरवठा संदर्भात पाहणी दौरा केला. यावेळी परिसरातील स्वच्छतेबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा व विद्युत विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दौर्यादरम्यान नागरिकांकडून ठराविक वेळेत पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर तत्काळ संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या समक्ष पाणी सोडणाऱ्या लाईनमन यांना बोलावून तक्रारीचे निवारण करण्यात आले. यापुढे पाणीपुरवठा सांगितलेल्या वेळेत आणि योग्य दाबाने करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांच्याकडून देण्यात आले.
“ मा.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा आज मी केला असून अधिकाऱ्यांनी तक्रारी योग्य असल्याचे मान्य करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रभाग क्र. १८ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर आणि दर्जेदार मिळणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. रस्ता रुंदीकरण असो, नालेसफाई असो किंवा पाणीपुरवठा — प्रत्येक काम तातडीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सोयीसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
सौ.ममता प्रितम म्हात्रे
नगरसेविका
प्रभागातील सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधून पाठपुरावा सुरू राहील, असेही नगरसेविका सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.





Be First to Comment