Press "Enter" to skip to content

‘डिजिटल शिक्षणाची’ नवी मशाल

नवीन शेवे येथील चैताली म्हात्रे ठरल्या रायगड ‘डिस्ट्रिक्ट विनर ‘अलिबाग मध्ये दिमाखदार गौरव

तृप्ती भोईर : उरण

शाळा ही केवळ इमारत नसते तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया असते ,हा पाया अधिक भक्कम करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देत रायगड जिल्हा परिषद शाळा नवीन शेवे येथील उपशिक्षिका सौ.चैताली राकेश म्हात्रे यांनी आपल्या कर्तुत्वाने सातासमुद्र पार नव्हे तर डिजिटल विश्वात रायगडचा डंका वाजवला आहे. त्यांच्या या शैक्षणिक धडपडीची दखल घेत ‘ओपन लिंक फाउंडेशन’ मार्फत चालवल्या जाणाऱ्या आचार्य विनोबा भावे ॲपच्या माध्यमातून त्यांचा अलिबाग येथे गौरव करण्यात आला.

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. नेहा भोसले मॅडम आणि प्राथ. शिक्षणाधिकारी मा. ललिता दहीतुले मॅडम यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. एका ध्येयवेढ्या शिक्षिकेच्या कामाचे कौतुक जेव्हा जिल्ह्याच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांकडून होते तेव्हा तो क्षण केवळ एका व्यक्तीचा उरत नाही तर संपूर्ण शिक्षण विभागाचा अभिमान ठरतो.

सौ चैताली म्हात्रे यांनी विनोबा ॲपचा वापर केवळ कर्तव्य म्हणून नाहीतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे माध्यम म्हणून केला आहे .त्यांनी अपलोड केलेले शैक्षणिक व्हिडिओ आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हे इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरले आहेत.

या प्रवासाची सुरुवात केंद्र स्तरावरील पुरस्काराने झाले त्यानंतर उरण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ निर्मला घरत मॅडम यांच्या शुभहस्ते तालुका स्तरावरील( ब्लॉक लेवल )सन्मान मिळाला आणि आता जानेवारी महिन्याच्या जिल्हास्तरीय विजेत्या म्हणून त्यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एखादा शिक्षक जेव्हा स्वतःच्या कौटुंबिक जबाबदारी सांभाळून शाळेतील मुलांसाठी नवनवीन प्रयोग करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने समाजाचा शिल्पकार ठरतो. चैताली म्हात्रे यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्दीचे चिकाटीचे आणि तंत्रस्नेही असण्याचे फळ आहे. त्यांच्या यशाबद्दल उरण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात ‘विनोबा ॲपच्या’ माध्यमातून त्यांनी शिक्षणाची ज्योत अधिक प्रज्वलित केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.