Press "Enter" to skip to content

खोपोलीतील शांतीनगर येथे ‘सखी स्टिचिंग क्लासेस’चा प्रगतिशील उपक्रम उत्साहात सुरू

खोपोली : ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणातून आर्थिक स्वावलंबनाची दिशा देण्याच्या उद्देशाने पहल नर्टरिंग लाईव्ह, खालापूर या संस्थेच्या माध्यमातून आणि विक्रम साबळे फौंडेशनच्या सहकार्याने खोपोली शहरातील शांतीनगर येथील साबळे अपार्टमेंटमध्ये १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘सखी स्टिचिंग क्लासेस’ या शिवणकाम प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.

महिलांना केवळ पारंपरिक कौशल्य नव्हे, तर आधुनिक डिझाईन, उद्योजकता व स्वावलंबनाची दृष्टी देण्याचा संकल्प यावेळी पहल नर्टरिंग लाईव्ह कडून व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे, खोपोली नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, आरोग्य सभापती मयुरी सिद्धांत शेलार, नगरसेविका सानिया मोहसीन शेख, वर्षा मोरे – ताराराणी ब्रिगेडच्या वर्षा मोरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर तसेच पहल संस्थेचे रोहिदास राठोड व संदीप मोहिते हे पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मनोगतात सचिन हिरे यांनी महिलांनी कायद्याची जाणीव ठेवून स्वाभिमानाने उभे राहावे, असे आवाहन केले. विक्रम साबळे यांनी कौशल्यविकास हा खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाचा पाया असल्याचे नमूद केले. गुरुनाथ साठेलकर यांनी सद्य स्थितीत महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे किती आवश्यक आहे, यावर भाष्य केले. वर्षा मोरे यांनी महिलांनी संघटित होऊन स्वतःचे छोटे उद्योग उभे करावेत, असे सांगितले.
संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना आवश्यक साहित्य पुरविण्यात आले असून पुढील काळात उत्पादन विक्रीसाठी मार्गदर्शन, बाजारपेठेची जोड व स्वयंरोजगार संधी निर्माण करण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमात सर्वसामान्य व गरजू कुटुंबातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर आणि निर्णयक्षम बनविण्याकडे हा उपक्रम एक ठोस पाऊल ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन रेश्मा शाहीद शेख व शाहीद शाफि शेख यांनी केले. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक परिवर्तनाच्या उपक्रमाचा यशस्वीरीत्या प्रारंभ झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.