Press "Enter" to skip to content

पैशांसाठी नाती तोडू नका : महेंद्रशेठ घरत

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते श्री वाघेश्वर मंदिराचे लोकार्पण

उलवे, ता. १६ : महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पेण येथील कळवे (टेप) येथे श्री वाघेश्वर मंदिराचे लोकार्पण महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते रविवारी (ता.१५) झाले.

यावेळी ते म्हणाले, “आमच्याकडे गवताचे पाते जरी आले तरी त्याची तलवार होते. गेली तिसेक वर्षे वैभव पाटील माझे सहकारी आहेत. त्यांनी दिवंगत चंद्रकांत पाटील गुरुजी आपल्या वडिलांचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. शिवशंकराचे देखणे आणि सुंदर मंदिर पाहून मला मनस्वी आनंद झाला आहे. येथील ग्रामस्थांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. येत्या काळात येथे विकासाची गंगा येईल. तुमच्या जमिनी म्हणजे सरकारच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे सरकारची वक्रदृष्टी लवकरच येथे पडेल. त्याबदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, पण या पैशांमुळे नाती तोडू नका. बहिणींनाही समान वाटा द्या. मी दिला, म्हणून मी आज आनंदी आहे. लाखमोलाच्या जमिनी कवडीमोल भावाने विकण्याची घाई करू नका. आज गुरचरण जमिनी तुमच्या हातात आहेत. बिन्धास्त घरे बांधा, परंतु गावातल्या गावात भांडणे करू नका, शेवटी आपल्याला खांदा देण्यासाठी गावातीलच चार माणसे हवीत ना, याचा विचार करा. माझे गाव शेलघर; परंतु १५-२० वर्षांच्या अथक प्रयत्नाने सिडकोच्या माध्यमातून सुनियोजित विकास केला आहे. लवकरच गावात आठ कोटींचे भव्यदिव्य मंदिर उभारत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हेवेदावे बाजूला ठेवावे लागतात. मी गावच्या विकासासाठी पुढाकार घेऊन तेच केले. वाघेश्वर मंदिराच्या रूपाने कळवे गाव नावारूपास येईल. या मंदिराच्या बांधणीत ज्यांनी ज्यांनी खारीचा वाटा उचलला आहे, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.”

यावेळी सुखदा मुळ्ये घाणेकर यांचे कीर्तन झाले, त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. कळवे येथील श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, बाळगोपाळ भजन मंडळ, हनुमान प्रासादिक भजन मंडळ यांनी भजन सादर केले. लावण्या पाटील हिने आपल्या सुमधुर आवाजात भजन सादर करून महेंद्रशेठ घरत यांचीही शाब्बासकी मिळविली. 
यावेळी मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली होती. 

यावेळी वैभव पाटील यांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार केला. वाघेश्वर मंदिरासाठी महेंद्रशेठ घरत यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. यावेळी एम. जी. ग्रुपचे सहकारी आवर्जून उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.