Press "Enter" to skip to content

“श्रद्धेला सुरक्षिततेची जोड” – दिंडीसाठी रिफ्लेक्टर जॅकेट्सचा अभिनव उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरून घाटमाथ्याकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांच्या दिंड्या हा श्रद्धेचा प्रवास असला, तरी तो अनेकदा जीवघेणा ठरतो. अवघड वळणे, तीव्र उतार–चढण आणि भरधाव वाहने यामुळे वाहनचालकांना रस्त्यावर चालणाऱ्या भाविकांचा अचूक अंदाज येत नाही. परिणामी छोटे–मोठे अपघात घडतात आणि काही वेळा जीवितहानीही होते.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन खालापूर तालुक्यातील चौक–टेंबरी गावातून शनि शिंगणापूर येथे जाणाऱ्या दिंडीसाठी “अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था (हेल्प फाउंडेशन)” यांच्या माध्यमातून धनंजय गीध यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण आणि जीवनरक्षक उपक्रम राबविण्यात आला.

दिंडीत सहभागी प्रत्येक भाविकाला रिफ्लेक्टर सेफ्टी जॅकेट्स, कॅप्स आणि सिग्नल बॅटन देण्यात आली. घाटातील अंधाऱ्या आणि धोकादायक वळणांवर भाविक स्पष्ट दिसावेत, यासाठी ही साधने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

या निमित्ताने हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी सामाजिक संघटनांना आवाहन केले की, पारंपरिक अन्नदानाबरोबरच आता “जीवनदान” देण्याच्या दृष्टीने सुरक्षा साधनांचे वाटप करणे काळाची गरज आहे. श्रद्धेला सुरक्षिततेची जोड दिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिंडी प्रमुखांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अनेक वर्षे दिंडीत सहभागी होत असताना अन्नदानाचा अनुभव घेतला; मात्र सर्वांच्या जीवनरक्षणासाठी सुरक्षा साधने देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून तो एक सकारात्मक पायंडा ठरेल. सुरक्षेचे सर्व निकष पाळण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.

या उपक्रमात गुरुनाथ साठेलकर, धनंजय गीध, अमोल कदम, महेश भोसले, पंकज बागुल आणि ऋषिकेश विश्वकर्मा यांचा सक्रिय सहभाग होता. महामार्ग पोलीस आणि आरटीओ विभागालाही या उपक्रमातून सहकार्य होईल, तसेच समाज–प्रशासन समन्वयातून अपघातमुक्त दिंडीचा आदर्श निर्माण होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. श्रद्धेच्या प्रवासात सुरक्षिततेची नवी दिशा देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.