Press "Enter" to skip to content

वेळ पडल्यास नगरविकास आघाडी एक दिवशीय उपोषण करणार

पेण स्वीकृत नगरसेवक निवड बाबत नगराध्यक्षांकडून अन्याय- नगरसेवक संतोष श्रृंगारपुरे

पेण, ता. १२ (वार्ताहर) : पेण नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या झालेल्या सभेमध्ये नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांनी नगरविकास आघाडीच्या वाटेला आलेल्या एका स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीबाबत जाणून-बुजून अन्याय केला असल्याचे नगर विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा नगरसेवक संतोष श्रृंगारपुरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

१६ जानेवारी रोजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवड करीता एका विशेष सभेचे आयोजन केले होते सभेमध्ये उपनगराध्यक्ष आणि एकूण तीन स्वीकृत नगरसेवकांचे नांवे जाहीर करायची होती परंतु नगराध्यक्षा यांनी भाजप पक्षातील दोन स्वीकृत नगरसेवकांच्या नावांचे वाचन करून त्यांना घोषित केले.परंतु नगर विकास आघाडीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर यांचे नांव वाचन न केल्याने याबाबत आम्ही सभेत विचारणा केली असता नगराध्यक्षा यांनी सांगितले की सदर स्वीकृत बाबत आमच्याकडे तक्रार आली आहे म्हणून थांबविले आहे.

यावेळी लागलीच आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे १९ रोजी पत्र देऊन तक्रार केली असता जिल्हाधिकाऱ्यांनीही नगरपालिकेला २१ डिसेंबर २०१६ च्या अध्यादेश नुसार सदर निवडी बाबत पत्रानुसार सांगितले परंतु त्यानंतरही पुन्हा एका तक्रारीमुळे उपेंद्र कोलाडकर यांचे नाव जाहिर करण्याचे जाणून बुजून ठेवले आहे.त्यामध्येही नगर विकास आघाडीने जिल्हाधिकारी यांच्या समोर प्रतिज्ञापत्र देऊन आमची बाजू मांडली आहे.एकीकडे जिल्हाधिकारी यांचे पत्र मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना येऊनही आणि मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष यांना या निवडीबाबत सांगूनही नगराध्यक्षा नगर विकास आघाडीच्या स्वीकृत नगरसेवकाबाबत वारंवार अन्याय करत आहेत.जोपर्यंत स्वीकृत नगरसेवकाचा कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत विशेष समित्यांची सुद्धा निवड रखडली असल्याने याबाबत आमच्यासह सर्व नागरिकांवर अन्याय होत आहे त्यामुळे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही वेळ पडल्यास एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे नगरसेवक संतोष श्रृंगारपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

यावेळी नगरसेविका सुजाता डाकी, माजी नगरसेवक मंगेश पेंडामकर, रवि जाधव, उपेंद्र कोलाडकर, विजय शहा आदि उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी याला दुजोरा देत जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या पत्राची माहिती नगराध्यक्ष यांना दिली असून स्वीकृत नगरसेवक बाबतचा निर्णय त्यांचा आहे असे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.