
पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाथ पाटील यांची आज (मंगळवार, दिनांक १०) बिनविरोध निवड झाली. शेकाप महाविकासआघाडीकडे पक्षीय बलाबल नसल्याने अखेरी त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले. सार्वत्रिक निवडणुकीत या पूर्वीच दारुण पराभव झाल्याने महापौर उपमहापौर निवडणुकीतसुद्धा नाचक्की होऊ नये यासाठी महाविकास आघाडीला पर्याय शिल्लक राहिला नव्हता. भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती. निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
या निवडीनंतर पनवेल शहरात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या आणि ‘एकच वादा प्रशांत दादा’ गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महारांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ भाजप महायुतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. या निवडणुकीत भाजपने ५५, शिवसेनेने २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवत एकूण ५९ जागांसह पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली. नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील आणि उपमहापौर प्रमिला पाटील यांनी पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.या प्रसंगी बोलताना नितीन पाटील यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर देण्यात येईल. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण विजयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि समस्त मतदार पनवेलकरांचे मनःपूर्वक आभार मानले. सर्वांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

महापौर नितीन पाटील यांना आदराने ‘भाई’ म्हणून संबोधले जाते. पनवेल तालुक्यातील कासारभाट त्यांचे मुळगाव. सामाजिक कार्य चालवत पुढे त्यांनी राजकारणात पदार्पण केले. दोन वेळा नगरसेवक म्हणून जबाबदारीने काम केले. सभागृहातील त्यांचा अनुभव, विषयांची सखोल मांडणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. जनसंपर्क व्यापक व मजबूत आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तत्पर. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पनवेल विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी केलेले नियोजन, समन्वय आणि नेतृत्व पक्षाच्या यशात महत्त्वाचे ठरले आहे.सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सुरुवातीपासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले आहेत. अभिनव मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत.त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर महापौर पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून आगरी समाजाचा पहिला महापौर म्हणून त्यांनी सन्मान मिळविला आहे.
उपमहापौर प्रमिला पाटील ह्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतिभूमी शिरढोण गावाची लेक आहे. भाजप कळंबोली मंडलच्या खजिनदार व सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला पाटील यांनी आपल्या कार्यातून कळंबोलीच्या राजकारणात ओळख निर्माण केली आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक-सामाजिक सबलीकरण करत त्यांनी शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळात पोहोचवल्या.नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०७, ०८ व ०९ मधून भाजप महायुतीचे १२ पैकी १२ उमेदवार विजयी झाले. प्रभाग ०७ मधून प्रमिला पाटील यांनी विद्या गायकवाड यांचा पराभव केला. त्यांच्या सामाजिक कार्य व संघटन कौशल्यामुळे त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली आहे.




Be First to Comment