

मुलांना घडवण्यात पालकांनी दुर्लक्ष करू नये ! – योगेश ठाकूर, सनातन संस्था
कळंबोली- आताचे आधुनिक तंत्रज्ञान आणि धावपळीचे युग यामुळे पालकांना मुलांचे संगोपन करणे हे फार मोठे आवाहन बनले आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकत्व ही एक सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे; जी केवळ मुलांच्या मूलभूत, पालनपोषणाच्या गरजा पुरवण्यापुरती मर्यादित नसून मुलांना या आधुनिक आणि कृत्रिम तंत्रज्ञानाच्या जगात वावरताना मुलांना संस्कारक्षम बनवण्याचे फार मोठे दायित्व अंगीकारते. सध्या आई-वडील दोघेही कामावर जातात, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांसाठी वेळ काढणे, त्यांच्या अडचणी जाणून दिशा देणे याकडे दुर्लक्ष होतांना दिसते. मात्र मुलांची जडण घडण करण्यात पालकांनी दुर्लक्ष करु नये, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. योगेश ठाकूर यांनी येथे केले. सनातन संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व बालसंस्कार वर्गात येणाऱ्या बालक आणि त्यांच्या पालकांसाठी बालक पालक मेळावा नवीन सुधागड शाळा, कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या बालक- पालक मेळाव्यात बोलत होते.
श्री. योगेश ठाकूर पुढे म्हणाले की, सनातन संस्थेच्या बालसंस्कारवर्गात मुलांना श्लोक म्हणवून घेणे, समाजात कसे वागावे? योग्य कृती कशी करायची? अभ्यास करताना देवाला प्रार्थना केल्याने आणि नामजप केल्याने कसा लाभ होतो,हे सांगितले जाते. पालकांनी मुलांना बालसंस्कार वर्गात पाठवल्याने संस्कारवर्गाच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार होतात आणि योग्य कृती करण्याच्या दृष्टीने साधनेच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू होते.’ ‘पालकत्व’ निभावताना मुलांच्या कोणत्या समस्या आहेत ? त्या कशा हाताळाव्या हे सुद्धा यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या मेळाव्यात पालकांनी मुलांमध्ये झालेले पालट संवाद सत्रात सांगितले. ‘मुलांमध्ये अनपेक्षित बद्दल दिसून आले. मुले सकाळी स्वतःहून उठतात आणि देवपूजा आवडीने करतात. बालसंस्कारवर्गात शिकवले गेलेले श्लोक सकाळ-संध्याकाळ म्हणतात सण-उत्सवाच्या वेळी रांगोळी काढणे, शाळेत जाण्याची तयारी स्वतःहून करणे. मुलांचा रागीटपणा कमी झाला आता नम्रतेने वागतात. वयस्करांना नमस्कार करतात’. याविषयी पालकांनी यावेळी सांगितले.



Be First to Comment