
पेण खारेपाट भागात पाणी टंचाई माजी जिप.सभापती संजय जांभळे आक्रमक
पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वाशी वडखळ विभागात येत्या आठवडाभरात एक- दोन दिवसच पाणी पुरवठा होणार असल्याचे पत्र संबंधित सरपंच, प्रशासकांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयने पाठविल्याने या पाणीटंचाई करीता माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे आक्रमक झाले असून येत्या जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या माध्यमातून वडखळ विभागात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
गेल्या काही वर्षांपासून पेण खारेपाटा भागातील जनता पाणीटंचाईला सामोरे जात असताना अनेक मोर्चे आंदोलने होऊन त्यावेळी या भागासाठी निधी उपलब्ध झाला मात्र आज पर्यंत येथे एक थेंबही पाणी आले नाही एकीकडे केंद्र शासनाची जल जीवन मिशन योजना सुद्धा कुचकामी ठरली आहे नुसत्या टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत मात्र त्यामध्ये पाणीच नाही या कामांमध्ये करोडोचा भष्टाचार झाला असून या निवडणुकीत जे उमेदवार उभे राहत आहेत त्यांनी येथील पाणीटंचाईच्या संदर्भात कधीही लक्ष घातले नाही त्यामुळेच ३८ कोटींच्या योजनेचा बोजवारा उडाला आहे.
आठवड्यात अनेकदा पाईपलाईन फुटुन पाणीपुरवठा विस्कळीत होत असतो त्यातच हेटवणे धरणातील भूमीगत कालव्याच्या कामामुळे उन्हाळ्यातील शेती लागवडीचे उत्पन्नही बुडाले आहेत.त्यामुळे खारेपाटातील या समस्या सोडविण्यासाठी जनतेच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या वडखळ वाशी मतदारसंघात मी आणि माजी स्वर्गीय पत्नी निवडून आलो आहोत त्यामुळे जनतेचे पाठबळ आजही आमच्या पाठीशी उभे असल्याने येत्या जिल्हा परिषदेच्या वडखळ गटात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवणार असल्याचे संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.सदर पत्रकार परिषदेला कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.



Be First to Comment