
पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या वडखळ हद्दीतील मूळचा उत्तर प्रदेश येथे राहणारा अनिलकुमार फुल्लन रामता वय २८ वर्ष यांने आपला आधार कार्ड हरवल्याचे कारण देत दि. १२ रोजी वडखळ पोलीस ठाण्यात येऊन अधिकारी वर्गासह कर्मचारी यांच्या अंगावर धावून येत येथील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करत पोलीसांनी त्याला अटक केली आहे. मात्र अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे याबाबतचे निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली डीवायएसपी जालिंदर नालकुल यांना देण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे परप्रांतीय वाढले असून अनेक परप्रांतीयांनी येथे अनाधिकृतपणे व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे असून रायगडसह महाराष्ट्र पोलीस जनसामान्यांचे रक्षण करीत असताना अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयाकडून असे कृत्य होत असतील तर ते निषेधार्थ आहे.पेण शहर किंवा तालुक्यातील ग्रामीण भागात हे परप्रांतीय राहून असे कृत्य करत असतील तर पोलीस प्रशासनाने अशा परप्रांतीयांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली डीवायएसपी पेण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



Be First to Comment