पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव….!
सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या आजवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा शनिवारी (दि.15) रायगड पालकमंत्री ना.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात रायगड पोलीस परेड ग्राउंड येथे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेने कोरोना व निसर्ग चक्रिवादळ संकट आणि कोल्हापूर येथील पूर परिस्थितीत केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातील महत्वपूर्ण सहभाग यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रतिष्ठान नेहमीच लोकोपयोगी व समाजाभिमुख उपक्रम राबवित असते. विशेष म्हणजे प्रतिष्ठान मध्ये तरुणांचा भरणा अधिक आहे. गड, किल्ले संवर्धन,स्वछता मोहीम, वृक्षलागवड, रक्तदान शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात प्रतिष्ठान एक पाऊल पुढे राहिले आहे.
सदर सन्मान शिवॠण च्या सर्व कार्यकर्त्यांचा, संस्थेवर विश्वास ठेऊन वेळोवेळी सढळहस्ते मदत करणाऱ्या दात्यांचा, हितचिंतकांचा संस्थेच्या कार्याला जनमानसात पोहचविणाऱ्या पत्रकार बंधूंचा, प्रेरणा देणाऱ्या मातापित्यांचा व गुरूवर्यांचा असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी सांगितले. सन्मानपत्र स्वीकारतांना शिवऋण प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष केतन म्हसके तसेच सचिन डोबले, गंगाधर पांडव, मयुर देशमुख, किशोर खरीवले, अमर लहाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल शिवऋण प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.






Be First to Comment