Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

राजस्थानी व हरियाणा मूळ रहिवाशांचा स्नेह मेळावा!; 
कळंबोली येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी) राजस्थानी सामाजिक विकास संस्था व हरियाणा निवासी संघाच्या संयुक्त विद्यमाने कळंबोलीत नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात भव्य सामाजिक-पारिवारिक सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला.

हा कार्यक्रम केवळ औपचारिक आयोजनापुरता मर्यादित न राहता, विविध समाजघटकांना एकत्र आणणारा, आपुलकी, एकोपा व सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा भावनिक मिलन सोहळा ठरला. 

       कळंबोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राजस्थान आणि हरियाणा मधील मूळ रहिवासी स्थायिक झालेले आहेत. वाहतूक आणि इतर व्यवसायामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कुटुंब कार्यरत आहेत. वेगवेगळ्या सण उत्सवामध्ये ते एकत्र येतात. या सर्वांना संघटित करण्याचे काम माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केले आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्याला समाजातील सर्व वयोगटातील नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. एकमेकांशी संवाद, स्नेहभोजन, अनुभवांची देवाणघेवाण आणि सांस्कृतिक जिव्हाळा यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कुटुंबवत्सल ठरला.

      आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या भाषणात त्यांनी सामाजिक संघटनांची भूमिका, परस्पर सहकार्याचे महत्त्व आणि एकत्रित प्रयत्नांतून समाजबांधणी कशी साध्य होते यावर सखोल भाष्य केले. विविध प्रांतातून आलेल्या समाजबांधवांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, मंडल अध्यक्ष अमर पाटील, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, रविनाथ पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मनाली ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष, राजस्थानी संघाचे अध्यक्ष, हरियाणा संघाचे अध्यक्ष तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निस्वार्थ भावनेने समाजातील प्रत्येक घटकाला मदत करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजेंद्र शर्मा यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

       समाज एकत्रीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचे, संघटन कौशल्याचे आणि शर्मा यांच्या सेवाभावी वृत्तीचे उपस्थितांनी कौतुक केले.  कार्यक्रमादरम्यान सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य, संस्कृती जपणूक आणि भावी पिढीसाठी मजबूत समाजरचना उभारण्याचा संदेश देण्यात आला. अशा प्रकारचे पारिवारिक व सामाजिक उपक्रम समाजातील दरी कमी करून आपुलकी वाढवतात, असे मत  वक्त्यांनी व्यक्त केले. एकता, प्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक समृद्धीचा संदेश देणारा हा भव्य पारिवारिक सोहळा उपस्थित सर्वांच्या मनात एक अविस्मरणीय क्षण ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.