Press "Enter" to skip to content

अरुंद रस्ते, नियोजनशून्य कामे : ई रिक्षाचा मार्ग बनतोय खडतर !

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच एमएमआरडीए ठेकेदारांची होतेय दिवाळी

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

माथेरानच्या आजवरच्या इतिहासात कधी नव्हे एवढा भरीव निधी येथील विविध विकास कामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे परंतु या निधीचा सदुपयोग केला जात नसल्याने भावी पिढीला पुढील काळात सुध्दा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या काही पॉईंट्सच्या सुशोभीकरणासाठी, दस्तुरी नाका ते पांडे रोड पर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते त्याचप्रमाणे नेरळ माथेरान घाटरस्त्यासाठी मिळून १२३ कोटी रुपयांचा भरीव निधी सन २०१३ मध्येच प्राप्त झाला होता. घाट रस्त्याच्या कामात सुध्दा अत्यंत दिरंगाई अन चालढकल केल्यामुळे केलेली कामे जास्त काळ टिकतील याचीही शाश्वती देता येत नाही. तर काही पॉईंट्स वरील सुरू असलेली कामे पाहता काळ्या दगडांचा खच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वेढलेल्या अवस्थेत दिसत आहे.अनावश्यक आणि नियोजनशून्य कामे यामध्ये रेटून नेली जात आहेत. केवळ आपल्या बिलांची रक्कम कशाप्रकारे वाढवता येईल याकडे संबंधित ठेकेदारांने अगदी बारकाईने लक्ष केंद्रित केलेले स्पष्टपणे दिसून येत आहे.दस्तुरी नाक्यापासून ( अमन लॉज) रेल्वे स्टेशन समोरून सुरू करण्यात आलेले काम खूपच घाईगडबडीत करण्यासाठी ठेकेदारांची खूपच धावपळ उडाली आहे. त्यामुळे होत असलेल्या कामांमुळे रस्ता अरुंद झालेला आहे. याच ठिकाणी काळोखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिचढाव भागातील चढावाचे काम तसेच ठेऊन ग्याबियन वॉल मुळे रस्ता खूपच अरुंद करण्यात आला आहे. गरज नसताना सुध्दा या वॉल बांधण्यात आलेल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला जागा उपलब्ध असताना सुध्दा या वॉल मुळे अरुंद रस्त्यावरून हातरीक्षा आणि घोडेवाल्याना आगामी काळात व्यवसाय करताना खूपच त्रासदायक बनणार आहे.चुकीच्या पद्धतीने कामे पूर्ण केली जात असताना सुध्दा प्रशासन मात्र मुगगिळून बघ्याची भूमिका पार पाडत आहेत.गावातून सुतभर देखील विरोध केला जात नसल्याने ठेकेदारांची मात्र लॉक डाऊन मध्ये सुध्दा दिवाळी साजरी होत आहे.आजी-माजी लोकप्रतिनिधीची सुध्दा काहीच हरकत नाही त्यामुळे यामध्ये काय गौडबंगाल आहे हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.४६ कोटींचा निधी केवळ दस्तुरी ते पांडे रोड साठी खर्च करण्यात येणार आहे परंतु या पैशाचा अक्षरशः चुराडा केला जाणार आहे यात शंका नाही. आगामी काळात लवकरच इथे पर्यावरण पूरक ई रिक्षा धावणार आहे त्यासाठी सर्व त्या बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. दस्तुरी( काळोखी) चा चढाव काहीच कमी केला नसल्याने सद्यस्थितीत हातगाड्या ओढणाऱ्या स्थानिक युवकांना रक्ताचे पाणी करून ही अतिकष्टदायक कामे लॉक डाऊन मुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता करावी लागत आहेत. काळोखीचा चढाव कमी केला नसल्याने पुढील काळात ई रिक्षा साठी हा मार्ग खूपच खडतर बनणार आहे. लोकप्रतिनिधी केवळ ई रिक्षा यावी असा खोटा आव आणून मतांच्या वोट बँकेसाठी आणि श्रेयवादा साठी अन्य व्यावसायिक ज्यांच्यामुळेच हे गाव आजही विकासापासून खूपच पिछाडीवर पडले आहे अशांना खुश ठेवण्यासाठी श्रमिक हातरीक्षा चालकांची घोर फसवणूक करीत आहेत असेही श्रमिकांमधून बोलले जात आहे

दस्तुरी काळोखीतील १०० मीटर रस्त्याचा चढ कमी झाला तरच माथेरानच्या विकासाला गती मिळणार आहे.कारण ई रिक्षा चोवीस तास दस्तुरी नाक्यावरून स्थानिक व पर्यटकांना सेवा देणार आहे केंद्र सरकार माथेरानला पर्यावरण पोषक ई रिक्षाला परवानगी देण्यास तयार आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल डिझेल वाहनांना परवानगी देणार नाहीत ई रिक्षांची क्षमता सपाट रस्त्यावर चालू शकतात API ठेकेदाराने काही दिवसांपूर्वी ई टेम्पो आणून प्रयोग करून पाहिला मात्र चढणीच्या रस्त्यावर तो चालला नाही .
अजूनही वेळ गेली नाही नगरपालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे व रस्त्याचा चढ कमी करण्याच्या सूचना एमएमआरडीए ला देऊन काम करणे शक्य आहे. लॉक डाऊन मुळे सध्या माथेरानचे बरेच तरुण हात गाडी ओढून घर चालवीत आहेत या तरुणांनी सांगितले हा चढ जीवघेणा आहे रक्ताचे पाणी करतो काही झाले तरी चढ कमी करा अश्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनील शिंदे– सचिव श्रमिक हातरीक्षा संघटना माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.