रुग्णालयासाठी ओएनजीसीची ५० कोटी देण्याची तयारी !
स्वातंत्र्यदिनी तहसीलदार आजच्या बैठकीचे वृत्तांत देणार कार्यकर्त्यांना !!
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )
उरण सामाजिक संस्थेने केवळ समुद्रात उतरून आंदोलन करण्याच्या अनोख्या आंदोलनाची तयारी करताच गर्भगळीत झालेल्या प्रशासनाने आज संस्थेच्या पदाधिकारी यांच्या सोबत सामाजिक अंतराचे भान ठेवून तातडीने बैठक घेतली या बैठकीत पुढील प्रत्येक महिन्याला मंत्रालयात उरणच्या मल्टीस्पेशालिटी रुग्नालयाबाबत पाठपुरावा करणेकामी संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत स्वत: उपस्थित राहण्याचे अभिवचन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले आहे तर याच बैठकीत उरणच्या स्थानिक विकासाला फारसा कधीही हातभार न लावणाऱ्या ओ एन जी सी प्रशासनावने तब्बल ५० कोटी रुपये देण्याचे मान्य केले असल्याने उरण सामाजिक संस्थेच्या दणक्याने प्रशासकीय यंत्रणा ताळ्यावर आली असल्याचे समोर आले आहे.
या बैठकीकडे कानाडोळा करणाऱ्या केंद्र सरकार प्रणित जे एन पी टी प्रशासनाचा जाहीर धिक्कार या निमित्ताने करण्यात आला आहे या बैठकीत काय निर्णय झाला आहे याची माहिती उद्या सकाळी साडेदहा वाजता स्वतः तहसीलदार आंदोलन स्थळी येऊन देणार असल्याने पिरवाडी किनारी होणाऱ्या या आंदोलन स्थळी जास्तीत जास्त उरण करांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले आहे.
बैठकीला ओएनजीसी चे अधिकारी यांच्यासह उरण सामाजिक संन्स्थेचे सचिव संतोष पवार , दिनेश घरत यांच्यासह रुपेश पाटील , मचिंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते
उरण तालुक्यात मागील दहा वर्षात केवळ रस्ता अपघातात सुमारे साडेआठशे ते नऊशे तरुणांना वेळेवर योग्य उपचार ना मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे त्याचप्रमाणे वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अनेक हृदयरोग रुग्ण आणि अत्यवस्थ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. भराभर प्रकल्पाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याची यामुळे संपूर्ण परिसरात छी थू होत आहे.
तालुक्याला एक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व्हावे या करिता राजकीय पातळीवरून ज्या त्वेषाने प्रयत्न व्हायला हवे होते ते झालेले नाहीत त्यामुळेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाच्या माध्यमातून दबदबा असलेल्या उरण सामाजिक संस्थेने मागील दहा वर्षात हा विषय सातत्याने लावून धरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिका देखील दाखल केलेली आहे. या याचिकेची दाखल घेऊनच मा न्यायालायाने जे एन पी टी प्रशासनाने कान उपटत ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे आदेश यापूर्वीच दिले गेले आहेत .
जे एन पी टी प्रशासनाने असे ट्रॉमा केअर सिम्टर उभे ही केले आहे मात्र त्यात फारशा सुविधा नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारांसाठी शेवटी मुंबई , नवी मुंबईतच धाव घ्यावी लागत आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही उरणकरांना मल्टीस्पेशालिटी रुग्णालय या ठिकाणी नाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून केवळ व्हेंटिलेटर उपलब्धता नसल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला असल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर उरण सामाजिक संस्थेने प्रशासनाचे उरण तालुक्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व्हावे या मागणीकडे उरणच्या पिरवाडी समुद्र किनारी समुद्रात बसून आंदोलन करण्याची अनोखी शक्कल लढविली होती. हे आंदोलन १५ ऑगस्ट रोजी करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.
संस्थेच्या या मागणीला तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती , सामाजिक संस्था , राजकीय पक्ष महिला मंडळे आदेंनी जाहीर पाठींबा व्यक्त केला होता. अनेकांनी तो लेखी स्वरूपात देत राज्याच्या मुख्यमंत्रयांसह जिल्हाधिकारी आदींना ही या पत्राच्या प्रती पाठविल्या होत्या त्या अनुषंगानेच आज उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत तातडीने बैठक यावेळी ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून उरणमधील रूग्णालयासाठी 50 कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे.तालुक्यात 100 खाटांच्या रूग्णालयासाठी भूखंड मंजूर झाला आहे. त्या संदर्भातील अडचणी दूर करण्यास सिडको अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. जेएनपीटीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यांचा निषेध करण्यात आला.
तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी उद्या पिरवाडी बीचवर येऊन आंदोलन कर्त्यांना आश्वस्त करण्याचे अभिवचन दिले आहे. उद्या 15 ऑगस्ट रोजी – स्वातंत्र्यदिनी ठरल्याप्रमाणे आंदोलन करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.वरील पार्श्वभूमीवर, तालुक्यातील जनतेने रुग्णालयाच्या मागणीसाठी उद्या 15 ऑगस्टरोजी सकाळी 10. 30 वा. पिरवाडी बीचवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले आहे.







Be First to Comment