सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) #
तालुक्यातील रानाडोंगरामध्ये अनेक प्रकारच्या वनौषधी आणि रानभाज्यांचे दरवर्षी पावसामध्ये नैसर्गिकरित्या उत्पादन होत असून त्याबाबत फारशी माहिती नसलेल्या सध्याच्या पिढीकडून या वनसंपत्तीचा ऱ्हास केला जात आहे. भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या यंत्रणेमार्फत चौपदरीकरणालगत या रानभाज्यांसह कृषी उत्पन्नाचे विक्रीकेंद्र सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी उदघाटनपर भाषणात व्यक्त केले.
यावेळी थरवळी, पाथरी, कुडयाच्या शेंगा, ढमाळी, टाकळा, भवरी, सुरण, पाली, शेवग्याचा पाला, कातवेल, भोरूची पाने, गरगट, आळंबी, कोळू, आळू, भारंगा, कुरडू, करटोली, करांदे अशा विविध प्रकारच्या रानभाज्या वडघरचे सुरेश जाधव, धारवलीचे वासुदेव पवार, फौजदारवाडीचे धनंजय झोरे व वासुदेव झोरे, आडावळेचे हरी उतेकर, चरईचे अनिल साळवी व सुभाष कासार, परसुलेचे सुधीर जाधव, क्षेत्रपाळचे विलास जाधव, करंजे येथील विठोबा घाडगे आदी शेतकऱ्यांनी प्रदर्शन व विक्रीसाठी आणल्या.
पोलादपूर एस.टी.बसस्थानकामध्ये रानभाजी महोत्सवाचे उद्धाटन महाड कृषी उत्पन्न बाजारसमितीचे व्हाईस चेअरमन वैभव चांदे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून तर राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ, मंडल अधिकारी सूरज पाटील, विजय निकम, आत्माचे कपिल पाटील, पोलादपूरचे उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, कृउबा संचालक लक्ष्मण मोरे, एस.टी.महामंडळाचे स्थानक प्रमुख कासार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यामागे या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर टाळण्याची गरज हाच हेतू असून मानवी जीवनाला या भाज्यांची उपयुक्तता आहे, अये आवर्जून सांगितले. पोलादपूर तालुका कृषी कार्यालयाचे कृषी सहायक अनिल वलेकर, दिनेश पांढरे, निवृत्ती बरकडे, विकास काकड, सतीश देशमुख, संतोष जाधव, सुषमा शेगडे, कोमल लोंढे, अनिल रूपनवर, पूनम क्षीरसागर, राहुल पाटील, चेतन लावंड, मनोज जाधव, दत्ता नरूटे आदींनी रानभाज्या महोत्सव यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले.
दिवसभरात पोलादपूर एस.टी.स्थानकातील या रानभाजी महोत्सवाला तहसिलदार दिप्ती देसाई यांच्यासह अनेक अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते, व्यापारी आणि ग्रामस्थांनी भेट देऊन रानभाज्यांची माहिती घेतली.






Be First to Comment