Press "Enter" to skip to content

आगरी-कोळी समाजातील दानशुरांनी पंढरपुरात धर्मशाळा उभाराव्यात

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे दानशुरांना आवाहन

उलवे, ता. १२ : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या चरणी लीन झाले. माऊली…माऊलीच्या गजरात चंद्रभागेतिरी अक्षरशः भक्तांचा मळा फुललेला होता. यंदा आंतराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत पंढरपुरात शनिवारी विठुरायाच्या चरणी लीन झाले. त्यानंतर त्यांनी कुंडेवहाळ, वहाळ, जासई आदी परिसरातील पंढरपुरात गेलेल्या दिंड्यांना भेट दिली. तेथील वारकऱ्यांशी संवाद साधला.

पंढरपुरात  आगरी समाजाची धर्मशाळा आहे, परंतु तेथे एवढी गर्दी होती, की कोण कुठे बसलाय, झोपलाय हे समजत नव्हते, धर्मशाळेचे टेरेसही पूर्णतः भरले होते, त्यामुळे पनवेल, खोपोल, कर्जत, उरण, नवी मुंबई, मुंबई येथील लाखो वारकऱ्यांना जागा मिळेल तिथे पथारी पसरावी लागली. हे विदारक चित्र महेंद्रशेठ घरत यांनी पाहिले आणि भावनिक झाले. विठुरायाच्या चरणी त्यांनी लीन होऊन आपण लवकरच पंढरपुरात आई-वडिलांच्या नावाने धर्मशाळा उभारू, असा दृढनिश्यच केला. तसेच आगरी-कोळी समाजात अनेक दानशूर, उद्योजक आहेत, त्यांनी वारकऱ्यांसाठी पंढरपुरात आपापल्या आई-वडिलांच्या नावे धर्मशाळा उभाराव्यात, असे आवाहन आगरी समाजातील धुरिणांना पंढरपुरात एकादशीनिमित्त वारकऱ्यांशी संवाद साधताना केले.  
यंदाही आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी चंद्रभागेत आंघोळ करून स्वतःला धन्य समजून विठुरायाच्या कळसाला हात जोडून परतीच्या मार्गाला लागले. अशा लाखो वारकरी संप्रदायातील मंडळींत विठुरायाच्या चरणी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत गेली 20-25 वर्षे लीन होतात. 

यंदा शनिवारी आणि रविवारी चंद्रभागेत अनेक वारकरी मंडळींत पाच-सहा तास मिसळले. चंद्रभागेच्या वाळवंटात यंदा वारकऱ्यांसोबत त्यांनी वारकरी फुगडीही खेळली आणि स्वतःला कृतार्थ झाल्याचे समाधान मानून रविवारीच परतीच्या मार्गावर लागले. 

येतेवेळी आपल्याला घडवण्यात सिंहाचा वाटा असणारे सातारा परिसरातील शिक्षक लोखंडे सर, गोरड सरांचे आशीर्वाद घेतले. दरवर्षी महेंद्रशेठ घरत पंढरपुरातील विठ्ठलाचा प्रसाद न चुकता शिक्षकांना घेऊन जातात. त्यांच्यासोबत संवाद साधून जणू विठ्ठलाशी एकरूप झाल्याचे समाधान मानून पंढरपूरचा विठुराया, वारकरी आणि शिक्षक असा त्रिवेणी संगम साधून महेंद्रशेठ घरत रात्री उशिरापर्यंत ‘सुखकर्ता’ बंगल्यावर आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.