
योजना विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील न्हावा शेवा टप्पा क्रमांक ३ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत भाववाढीशिवाय मुदतवाढ मंजूर करण्यात आली असून योजनेची कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा करण्यात येत आहे, असे लेखी उत्तर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पनवेल तालुक्यातील न्हावा शेवा टप्पा क्र. ३ पाणीपुरवठा योजना काही तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. या पाणी पुरवठा योजनेचा कार्यादेश डिसेंबर २०२० मध्ये देण्यात आला असून काम पूर्ण करण्याची मुदत ३० महिन्यांपर्यंत असताना योजना कार्यान्वित न झाल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रास पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे सदर न्हावा शेवा टप्पा क्र. ३ पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करुन पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी टंचाई दूर करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी दाखल केला होता.
या प्रश्नावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखी उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले कि, न्हावा शेवा टप्पा क्रमांक ३ पाणीपुरवठा योजना काही तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण असल्याची बाब खरी आहे. कोवीड-१९ हया साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे, मशीनरी, मनुष्यबळ उपलब्धता व हालचालीवर आलेली बंधने, मर्यादा, निविदा कार्यादेशानंतर स्टील साहित्यांच्या दरात झालेली असाधारण भाववाढ व त्यामुळे पाईप पुरवठा करण्यास कंत्राटदाराकडून झालेला विलंब, पळस्पेफाटा ते भोकरपाडा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे, कोवीड १९ च्या लॉकडाऊन पर्यंतच्या कालावधीत जागेच्या भू-संपादनाच्या कार्यवाहीस झालेला विलंब, जागेचा मोबदला न मिळाल्याने जलवाहिन्या टाकणेस संबंधित जागा मालकांचा अडथळा व रेल्वे, एक्सप्रेस वे, टोल प्लाझा क्रॉसिंग आणि ओएनजीसी परिसरातून जलवाहिनी टाकण्यास ओएनजीसीने परवानगी नाकारणे, अशा बाबींसोबत ठेकेदार में. जी.व्ही.पी. आर. इंजिनिअर्स हैद्राबाद यांचेकडून नियोजनानुसार काम होत नसल्याने निदर्शनास आले असून संबंधित या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. नवी मुंबई येथील झालेल्या नवीन विमानतळामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये झालेल्या व होत असलेल्या विविध संस्था जसे की, राष्ट्रीय महामार्ग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांचे मार्फत सुरु असलेल्या रस्ते प्रकल्पामुळे योजनेतून टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे स्थलांतरण करणे अपरिहार्य होत आहे. पर्यायाने पूर्ण योजनेच्या भौतिक व आर्थिक गोष्टीवर बंधने येत असून कामास विलंब लागत आहे. सद्यःस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पनवेल महानगरपालिका क्षेत्रास सद्यःस्थितीतील त्यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२६ पर्यंत भाववाढीशिवाय मुदतवाढ मंजूर करण्यात आली असून योजनेची कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असून सद्य:स्थितीत योजनेचे काम सुरु असून प्रगतीपथावर आहे.




Be First to Comment