Press "Enter" to skip to content

पोलादपूरच्या गुन्हेगारी इतिहासात प्रथमच चालत्या लक्झरीबसमध्ये चोरी

पोलीसांसमोर तपासाचे आव्हान-कशेडी घाटात थरारक घटनेत एक अटक

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-

तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या लक्झरी बसमधून गुरूवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास थरारक चोरीची घटना झाली. मुद्देमालाचे वर्णन व किंमत किरकोळ स्वरूपाचे असले तरी या चोरीमुळे पोलादपूर पोलीसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, धामणदिवी ग्रामस्थांच्या मदतीने रातोरात पोलादपूर पोलीसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एक संशयित आरोपी पकडण्यात आला असून त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये दोन वाहने आणि अजून पाच आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गुरूवारी पहाटे कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या वळणापासून सुरू झालेल्या खड्डयांच्या महामार्गावरून अतिशय मंद गतीने वळणे पार करीत मुंबई ते गुहागर अशी प्रवासी वाहतूक करणारी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची लक्झरीबस (क्र.एमएच9473) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या दिशेने निघाली असताना एका वळणावर एका प्रवाशाला कोणी अज्ञात व्यक्ती डाव्याबाजूच्या डिकीतील प्रवाशांचे सामान काढून रस्त्यावर टाकत असून अन्य व्यक्ती उचलून नेत असल्याचे दिसून आले. यावेळी सदर प्रवाशाने लक्झरी चालकाला ही घटना सांगून बस थांबायला लावली असता मागील अज्ञात वाहनांतून सदरचे सामान गोळा करून काही अज्ञात व्यक्ती पसार झाल्या.

हवालदार दीपक जाधव, पोना. रूपेश पवार, परेश मोरे, गणेश किर्वे आणि विनोद महाडिक या पोलादपूर पोलीसांनी तातडीने नाकाबंदी करून धामणदिवीचे माजी सरपंच कदम आणि ग्रामस्थांच्या मदतीने रातोरात घाटातील दरीतील जंगलभागात कोम्बिंग ऑपरेशन केले असता एका झाडालगतच्या पाईपामध्ये एक व्यक्ती लपलेला आढळून आला. पोलीसांनी हटकले असता त्याने तेथे उभा असलेल्या ट्रकचा ड्रायव्हर असल्याचे सांगितले. मात्र, ट्रकमध्ये तो झोपण्याऐवजी पाईपमध्ये का झोपला, याबाबत शंका निर्माण झाल्याने त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने दोन वाहने असून त्यातून प्रत्येकी तीनजण असल्याची माहिती दिली.

पोलादपूर पोलीसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली असून आरोपी अशोक धर्मराज जाधव (45, उंबरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद)येथील फासेपारधी समाजातील व्यक्ती असून त्याचे अन्य पाच फरारी साथीदार हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रय लालासाहेब शिंदे, संतोष पवार (सर्व रा.खामकरवाडी, उंबरा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) देखील फासेपारधी असल्याची माहिती प्राप्त झाली.

या गुन्ह्यांत आरोपींनी आठ प्रवाशांचे सुमारे 24 हजार 500 रूपये किंमतीचे घरगुती वापराचे कपडे, चीजवस्तु, रोख रक्कम तसेच गणपतीच्या डेकोरेशनचे सामान असलेल्या बॅगा चोरीस गेल्या आहेत. यामुळे अनेक प्रवाशांनी गणेशोत्सवाला गावी पोहोचल्यानंतर 10 दिवस क्वारंटाईन होण्यासाठी घेतलेले कपडे व सामान चोरीस गेल्याने त्यांची तारांबळ उडाली असून रात्रभर पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये खोळंबा झाल्याने प्रवाशांची चिडचिड वाढल्याचे दिसून आले.

यासंदर्भात सुनील शंकर दामले (35,साक्री,ता.गुहागर,जि.रत्नागिरी) या लक्झरी चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा र.नं.42-2020 भा.दं.वि.379,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव अधिक तपास करीत आहेत. पोलादपूरच्या गुन्हेगारी इतिहासात प्रथमच चालत्या लक्झरीबसमध्ये चोरी झाल्याने आगामी काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अशा प्रकारच्या गुन्हेगारीची शक्यता वाढीस लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.