Press "Enter" to skip to content

तहसीलदार श्री. अभय चव्हाण यांनी दिले आदेश

अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी दंड न भरल्याने आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि.च्या जमीनवर बसणार बोजा

६० लाखापेक्षा अधिक दंड वसुल व गुन्हा दाखल करण्यासाठी आदिवासी समन्वय समिती-रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांनी दिले होते निवेदन..

खालापूर/ प्रतिनिधी :

मौजे रानसई स. नं. ६४/१ या आदिवासी शेतकरी यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीमधून आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने अवैधरित्या माती उत्खन्न केल्या प्रकरणी श्रीम. ताराबाई बारकू कातकरी, श्रीम. शकुंतला रमेश कातकरी, बारकू देहू कातकरी, मारुती बारकू कातकरी यांनी अनेकदा महसूल खात्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर दि. ३१/०८/२०२३ रोजी स्थळ पाहणी आयोजित करून अवैधरित्या केलेले माती उत्खन्नाचे मोजमाप घेऊन दि.०४/०९/२०२३ रोजी मंडळ अधिकारी वावोशी यांनी तहसीलदार यांना अहवाल सादर केला होता.

त्याअनुषंगाने खालापूर तहसीलदार यांनी सुनावणी घेऊन दि. ०६/१२/२०२३ रोजी आदेश दिले आहे. त्यामध्ये १००० ब्रास माती काढण्यासाठी परवानगी घेतली असल्याचे म्हटले आहे तर १२९६.६० ब्रास इतक्या अधिकच्या प्रमाणात माती उत्खन्न झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार रक्कम ६०,०६,८२४/- (अक्षरी, साठ लक्ष सहा हजार आठशे चोवीस मात्र) एवढा दंड करून ३० दिवसाचे आत आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा. लि. कंपनीने भरणेचा आहे, असे तात्कालीन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी आदेश दिले होते, परंतु अद्यापही दंड भरला नाही. शासनाचा महसूल बुडविणे, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीतून मातीची चोरी करणे, शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. कंपनीवर गुन्हा दाखल व दंड वसुल करण्यासाठी रायगड आदिवासी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा, जिल्हा सदस्य जयवंत शिद, विष्णू खैर, संदीप भस्मा, रोहित कातकरी यांनी खालापूर तहसीलदार श्री. अभय चव्हाण, महसूल नायब तहसीलदार श्री. पवार यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती.

त्यानंतर महसूल खात्याने कायदेशीर प्रकिया करून आर.व्ही. लॉजिस्टिक पार्क प्रा.लि. कंपनीला केलेला दंड न भरल्याने कंपनीच्या जमीन मिळकतीचा शोध घेऊन त्यावर बोजा ठेवण्यासाठी वावोशी मंडळ अधिकारी यांना दि. २०/०६/२०२५ रोजी खालापूर तहसीलदार श्री. अभय चव्हाण यांनी पत्र काढले आहे. त्याबाबतची एक प्रत आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांना दिली असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.