Press "Enter" to skip to content

कोरोना फ्री वातावरणासाठी फ्री गणेश मूर्ती अभियान

उलवे रोटरी क्लब चा स्तुत्य उपक्रम

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल #

यंदाचे वर्षी गणेशोत्सवावर कोरोना महामारीचे सावट आहे.उत्सव, सोहळे साजरे करत असताना कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये या प्रामाणिक उद्देशाने रोटरी क्लब ऑफ उलवे नोड च्या वतीने अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष उल्लेखनिय म्हणजे कोरोना ची साखळी तोडणे बरोबरच निसर्ग संवर्धनाचे देखील काम या अभियानामुळे होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष तथा रोटरी क्लब ऑफ उलवे चे मार्गदर्शक रवीशेठ पाटील यांनी सांगितले की,उत्सव साजरे करत असताना सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे.गणेश पूजा,आरती,महाप्रसाद यावेळी ते कदाचित शक्य होईल, परंतु विसर्जनाच्या वेळी नदी घाट, विसर्जन घाट, समुद्रकिनारे, तलाव अशा जलाशयांवर होणारी गर्दी टाळणे मात्र शक्य होत नाही.त्यामुळे कोरोना महामारी मध्ये विषाणूची साखळी तोडण्यासाठी विसर्जन घाटांवर गर्दी होऊ नये या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ उलवे यांच्या वतीने फ्री गणेशा ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत आमच्या क्लबच्या वतीने शाडूच्या पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्ती, गणेश भक्तांना प्रदान करण्यात येतील. त्याकरिता अनामत रक्कम स्वीकारली जाईल व आपआपल्या घरी गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर त्या मूर्तीचे विसर्जन करून त्याची माती आमच्याकडे परत केल्यास अनामत रक्कम परत देण्यात येईल.असे केल्याने विसर्जन घाटांवर गर्दी कमी होईल व निसर्ग संवर्धनाचे कामी ही शाडूची माती पुनर्प्रक्रिये मध्ये आणता येईल.

या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून संस्थेच्या वतीने आणलेल्या जवळपास 80 टक्के गणेशमूर्ती बुक झालेल्या आहेत. तसेच जर कुणा गणेश भक्ताला स्वयंस्फूर्तीने अनामत रक्कम परत घ्यायची नसेल तर अशी जमा झालेली रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याच्याकामी खर्च केली जाणार आहे.

विषाणूची साखळी तोडणे, निसर्गाचा समतोल राखणे, आणि गणेश भक्तांच्या श्रद्धेच्या भावनेची जपणूक करणे असा त्रिवेणी संगम साधणाऱ्या या अभियानाबद्दल रोटरी क्लब ऑफ उलवे या संस्थेवर कौतुकाच्या स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.