Press "Enter" to skip to content

सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार !

हिंदु राष्ट्ररत्न : अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन;
सनातन धर्मश्री : मंत्री कपिल मिश्रा, चित्रपट निर्माते विपुल शहा, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, गौरीशंकर मोहता, शिल्पकार प्रमोद कांबळे
सनातन संस्थेच्या वतीने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात हिंदु धर्मासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी विशेष कार्य करणार्‍या अनेकांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार घोषीत करण्यात आले होते. त्यापैकी पुरस्कार प्राप्तकर्ते दिल्ली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष पू. अधिवक्ता हरि शंकर जैन यांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’, तर दिल्ली राज्याचे कला आणि संस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा, मुंबई येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री. विपुल शहा, मुंबई हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, ऋषिकेश येथील गीता भवनचे श्री. गौरीशंकर मोहता आणि अहिल्यानगर येथील प्रसिद्ध भारतीय शिल्पकार, आणि चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांना संतांच्या हस्ते ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे.

    
  मंदिर मुक्तीसाठी संघर्ष* : श्रीराम मंदिर, तसेच उत्तरप्रदेशातील काशी, मथुरा, मध्यप्रदेशमधील भोजशाळा आदी मंदिरांच्या मुक्तीसाठीही विनामूल्य न्यायालयीन लढा देणारे प्रखर धर्माभिमानी अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते दिल्ली येथे ‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पू. हरि शंकर जैन यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘‘हा पुरस्कार प्राप्त झाल्याने नवीन कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत अनेक मंदिरांच्या मुक्तीचे कार्य पूर्ण करणे ही आमची जबाबदारी समजून ते पूर्ण करणार.’’

    हिंदु इकोसिस्टमधून संघटन : हिंदु इकोसिस्टमच्या माध्यमातून लेखक, प्राध्यापक, वैज्ञानिक, कलाकार, इतिहासकार आणि धर्मप्रेमी यांना एकत्रित करून धर्म आणि राष्ट्र सेवेसाठी एक प्रभावी व्यासपीठ निर्माण करणारे, तसेच दिल्ली दंगलीत हिंदूंना साहाय्य करणारे दिल्लीचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. कपिल मिश्रा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते दिल्ली येथे ‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मनोगत व्यक्त करताना मंत्री श्री. कपिल मिश्रा म्हणाले, ‘‘गोवा येथे झालेल्या महोत्सवात केलेल्या शंखनादाचा आवाज वर्षानुवर्षे घुमेल. अशा प्रकारचा शंखनाद महोत्सव दिल्ली येथेही व्हावा अशी विनंती आहे.’’ अशाच प्रकारे ऋषिकेश येथील गीता भवनचे श्री. गौरीशंकर मोहता यांचा सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सत्कार केला.

 सत्य व संवेदनशील विषयावर चित्रपट निर्मिती : श्री. विपुल शहा यांनी ‘द केरला स्टोरी’ आणि ‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ या चित्रपटांच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ व नक्षलवाद यांसारख्या संवेदनशील सामाजिक विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी या सत्यघटनेवर आधारित चित्रपटांद्वारे केवळ व्यावसायिक यशच मिळवले नाही, तर संपूर्ण जगभरात मोठी जागृती घडवण्याचे कार्यही प्रभावीपणे केले. अशा सत्यनिष्ठ आणि राष्ट्रभक्त चित्रपट निर्माता-दिग्दर्शक श्री. विपुल शहा यांचे मुंबई येथे सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक  सद्गुरू अनुराधा वाडेकर यांनी ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सत्कार केला. मनोगत व्यक्त करताना श्री. विपुल शहा म्हणाले, ‘‘सनातन धर्मश्री पुरस्कार स्वीकारताना मी भावान्वित आणि आनंदी झालो आहे. या पुरस्काराने मला प्रेरणा मिळेल, ज्यामुळे आपल्या हिंदू समाजासाठी माझ्या कामाच्या माध्यमातून अजून काही चांगल्या चित्रपटाची निर्मिती करता येईल तसेच जागृती आणि निरंतर प्रयास चालू राहील.’’

 निरपराध हिंदू व सामान्य जणांना साहाय्य : काँग्रेसच्या काळात ‘हिंदु आतंकवादी’ ठरवण्यासाठी भयानक षड्यंत्रे करून हिंदुत्वनिष्ठांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्यात आले. अशा वेळी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, मडगाव बाँबस्फोट प्रकरण, तसेच अनेक खटल्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ व सामान्य जणांना विनामूल्य साहाय्य करून सत्य बाजू त्यांनी समाजात ठामपणे मांडली. त्यांचा सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू अनुराधा वाडेकर यांनी ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सत्कार केला. या वेळी मनोगत व्यक्त करताना अधिवक्ता पुनाळेकर म्हणाले, ‘‘आता राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी अनेक अधिवक्ते पुढे आले आहेत. ज्या ज्या अधिवक्त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे त्या सर्व अधिवक्त्यांचा हा बहुमान आहे आणि अधिवक्त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी नम्रपणे स्वीकारत आहे. जोपर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.’’

 आध्यात्मिक व सांस्कृतिक कलानिर्मिती : प्रसिद्ध भारतीय शिल्पकार आणि चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांना सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू श्री. नंदकुमार जाधव यांनी नगर येथे ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सत्कार केला. श्री. प्रमोद कांबळे यांनी स्वामीनारायण मंदिरासाठी स्वामीनारायण यांच्या जीवनावर आधारित १० भव्य सेट्स, ‘सारे जहां से अच्छा’ या नावाने ५०० महान भारतीय व्यक्तींचे विशाल पेन्सिल स्केच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मूर्ती, तसेच शिर्डीच्या प्रसादालयामध्ये ७० फूट उंच साईबाबांची मूर्ती घडवली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या परिक्रमा मार्गावर भगवान श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित १२५ चित्ररथ त्यांच्या दिशादर्शनाखाली तयार झाल्या आहेत. श्री. कांबळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ‘‘या पुरस्कारासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि पुढील कार्य करण्यासाठी मला यातून प्रेरणा मिळेल.’’

मे महिन्यात संपन्न झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शुभहस्ते हस्ते ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’, तर २१ जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्या वेळी देशस्तरावर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतना निर्माण करणार्‍या गोव्यातील ऐतिहासिक अशा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे आताही सनातन संस्थेच्या वतीने १ जणांना हिंदु राष्ट्ररत्न, तर ५ जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.