Press "Enter" to skip to content

गोल्डन कॉइन वाइन मार्ट विरोधात आंदोलन

खारघर वासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही- आमदार प्रशांत ठाकूर 

पनवेल (प्रतिनिधी ) खारघर वासीयांच्या गळ्याचा घोट घेणारे वाईन शॉप चालू देणार नाही. तसेच येत्या अधिवेशनामध्ये या विषयी आवाज उठवणार अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये दारूबंदी करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात दिली. खारघरमधील सेक्टर ६ येथील शहा आर्केड सोसायटीची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गोल्डन कॉइन वाइन मार्ट हे दारू विक्रीचे सुरु करण्यात आले आहे. या विरोधात संघर्ष संस्थेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात खारघरवासी तसेच सर्व पक्षीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आंदोलनामुळे गोल्डन कॉइन वाइन मार्ट तसेच जेजेस रसोई या रेस्ट्रॉरंट अॅण्ड बारने बांधलेले अनधिकृत बांधकाम पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पाडण्यात आले. 

    खारघर हा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या विकसित होत असलेला परिसर आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा खारघरला दारूमुक्त झोन घोषित करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, रहिवासी आणि सामाजिक संस्थांचा विरोध असतानाही वाईन शॉप सुरू केले आहे. खारघर संघर्ष समिती, लोकप्रतिनिधी आणि रहिवासी संघटनांकडून शासन दरबारी सातत्याने दारूबंदी बाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, १४ जूनला शहा आर्केडमध्ये वाईन शॉप सुरू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र निषेध करत, वाईन शॉप त्वरित बंद करण्यात यावे आणि खारघरला कायमचा दारूमुक्त झोन घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये विविध माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात असून खारघर शहराची नोंद नो लिकर झोन अशी अनेक वर्षांपासून आहे. मात्र असे असतानाही खारघरमध्ये वाईन शॉप सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाइनशॉपची परवानगी रद्द करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, खारघर येथील नागरिकांचा सुरूवातीपासूनच खारघर मध्ये दारू दुकाने आणि दारू बार येण्यास सक्तविरोध आहे. खारघर मध्ये दारूबंदी विषयी अनेक आंदोलने, निदर्शने झालेली आहेत. जानेवारी २०२५ पासून संघर्ष संस्थेच्या माध्यमातून दारूमुक्त खारघर शहर घोषित करावे म्हणून शासनाकडे मागणी केली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन सुरू केले आहे. गोल्डन कॉईन वाईन मार्ट हे नवीन वाईन शॉप सेक्टर ६ येथे उघडण्यात आले आहे. या वाईन शॉपला सोसायटी किंवा पनवेल महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजते. सदर वाईन शॉपला परवानगी दिली असल्यास ती रद्द करण्यात यावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे. तरी खारघर येथील गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉपला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी असे अधोरेखीत केले होते.

दरम्यान शुक्रवारी संघर्ष संस्थेच्या माध्यामतून खारघरमध्ये दारुबंदी साठी सर्वपक्षीय आंदोलन काढण्यात आले. यावेळी गोल्डन कॉईन वाईन मार्टने बांधलेले अनधिकृतपणे बांधण्यात आलेले शेड माहापलिकेच्या वतीने पाडण्यात आले. त्यानंतर जेजेस रसोई या रेस्टॉरंट अॅण्ड बारने बांबूचे शेड बांधण्याची परवानगी असतानाही त्यांनी लोखंडी बांधकाम काम केले होते. त्याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक भुमीका घेत जाब विचारला तसेच अनधिकृतपणे बांधण्यात आलेले बांधकाम महापालिकेच्या माध्यमातून पाडले. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी जनतेच्या भावनांना न्याय देण्यासठी जो काही संघर्ष करावा लागेल तो संघर्ष करू असे प्रतिपादन दारुबंदी साठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनावेळी दिली. या आंदोलनात जिल्हा सचिव ब्रीजेश पटेल, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटिल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नीलेश बाविस्कर, नरेश ठाकुर, अभिमन्यु पाटील, शत्रुघ्न काकड़े, गुरुनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, संतोष शर्मा, मंडल उपाध्याक्ष किरण पाटिल, अमर उपाध्याय, समीर कदम, निर्मला यादव, प्रिया दळवी, जुमा चक्रबर्ती, उपाध्याय संजय घरत, कीर्ति नवघरे, अजय माळी, शैलेन्द्र त्रिपाठी, अशोक जांगिड़, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, संघर्ष संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच खारघर मधील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.