Press "Enter" to skip to content

आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवकर, पनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रम संपन्न


आज संपूर्ण महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. राज्यभरात सर्वत्र सरकारी शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, पनवेल तालुक्यातील शिवकर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमच शाळेत प्रवेश करणाऱ्या लहान विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पाठ्यपुस्तके, साहित्य आणि गणवेश वाटप करण्यात आले.

आमदार विक्रांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, “हे चिमुकले विद्यार्थी म्हणजे देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय आहे. आगामी काळात या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे. या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आरोग्य आणि देशप्रेमाचे मूल्य मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून माझे आणि सरकारचे पूर्ण प्रयत्न असतील.” तसेच, “आमच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी धडपड करत असतात, अशा सर्व शिक्षकांचे मी मनापासून अभिनंदन करतो,” असेही त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार विक्रांत पाटील दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी होत लेझीम, ताशा च्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांमध्ये रमून गेले.

शाळा भेटीदरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी शाळेची इमारत, शिक्षण आणि सुविधांची पाहणी करून शाळेच्या विकास आराखड्याची माहिती घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीबाबत आवश्यक सूचना दिल्या. “या शाळेच्या इमारतीचा दर्जा उंचावण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री. आनंद ढवळे, उपसरपंच श्री. रविंद्र ढवळे, पंचायत समिती शिक्षण अधीक्षक नवनाथ साबळे, शिक्षणाधिकारी निंबाजी गीते, मुख्याध्यापिका सौ. सुनीता भोईर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विविध मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रथमच जिल्हा परिषद शाळांमध्ये लहान विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत होत आहे. हे सर्व महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या संकल्पनेतून होत असून, अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल आणि शाळांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल.

— आमदार विक्रांत पाटील कार्यालय.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.