Press "Enter" to skip to content

कशाला हवेत वलयांकित खेळाडू?

    रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या अठरा वर्षाच्या खडतर प्रवासानंतर एखादी आंतरराष्ट्रीय पातळीवर वलय नसलेली आणि होतकरू खेळाडूंना "घंटा सुद्धा"  महत्व न देणारी ट्रॉफी जिंकल्यावर एखादे राज्य सरकार जर व्हिक्ट्री परेड काढत असेल आणि त्यामध्ये बारा निष्पाप जीव आपले प्राण गमावत असतील तर ते नक्की कोणाचे अपयश आहे? इंडियन प्रीमियर लीग चे , रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ व्यवस्थापनाचे की कर्नाटक राज्य सरकार चे???
  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि अन्य डिजिटल टेक्नॉलॉजी ची केंद्रबिंदू बनू पाहणाऱ्या बेंगलोर शहरामध्ये जर का आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या दृष्टीने अनधिकृत आणि  देशांतर्गत स्पर्धेतील विजेत्यांचे स्वागत करण्याचे हेतूने "न भूतो न भविष्यती" असे स्वागत करण्यात येणार असेल तर आपला देश नेमका कुठे चाललाय? याचे विचार विनिमय करणे गरजेचे आहे.
   यामध्ये नक्की कोण दोषी ठरतो याबाबत विवेचन करण्यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामातील अंतिम सामन्या बद्दल थोडेसे लेखन करतो... विराट कोहली नामक अतिउत्साही आणि मीडिया अधिक पी आर यांच्या जोरावर सेलिब्रिटी बनू पाहणाऱ्यांना ज्या पद्धतीने "लार्जर दॅन लाइफ" कव्हरेज दिले गेले  या गोष्टीबद्दल मला प्रथमतः निषेध करू द्या. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये कोणीतरी जिंकणार ! कोणीतरी हरणार ! हे विधी लिखित असते... जिंकणाऱ्याची वाहवा होतेच.. परंतु सामना जिंकण्यासाठी ज्या विजीगीषू वृत्तीने प्रयत्न केले जातात त्यांना सुद्धा माध्यमे प्रसिद्धी देत असतात किंबहुना ती दिली पाहिजे असे मला मास मीडियाची डिग्री प्राप्त करताना शिकवले गेले होते. परंतु यंदाच्या हंगामातील आयपीएल फायनल नंतर विराट कोहली हाच या जगातील एकमेव क्रिकेटर आहे या आतताई भावनेतून माध्यमे हा इव्हेंट कव्हर करत होते. किंग्स इलेव्हन पंजाब चा कर्णधार श्रेयस अय्यर आणि अंतिम क्षणापर्यंत लढणारा शशांक सिंग हे खरे तर ह्या इंडियन प्रीमियर लीग च खरे विजेते आहेत पण आमच्याकडे माध्यमांवर पी आर चा इतका जबरदस्त प्रभाव पडला आहे की  या दोघांची गणना कस्पटासमन केली गेली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोस हेजलवूड याने आपल्याला 2023 चा वर्ल्ड कप जिंकू दिला नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण रोहित आणि टॉप ऑर्डर यांच्या आतताई फटक्यामुळे विकेट पडल्यानंतर इनिंग सांभाळणारा एकमेव श्रेयस अय्यर याची विकेट त्याने काढली होती.त्याच डोक्यावर चढलेल्या या गोलंदाजाची पिसे शशांक सिंग ने काढली... पण माध्यम आणि पी आर यांच्या पैसे खाऊन बातम्या लावायच्या वृत्तीमुळे बिचारा शशांक सिंग प्रसिद्धीपासून लांब राहिला....
    आता येणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बाबत थोडेसे स्पष्टीकरण देतो. गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये भारत अंतिम सामन्यात नक्की असेल अशी परिस्थिती असताना आपण भारत देशात आलेल्या न्यूझीलंड विरुद्ध व्हाईट वॉश स्वीकारला. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय फलंदाजीचे कणा आहेत असे आपण गृहीत धरत होतो. परंतु गरजेपेक्षा जास्त चेंडू वळणाऱ्या स्पिनिंग ट्रॅक वरती आपण अक्षरशः नामोहरम झालो. न्युझीलँडसाठी जो स्पिनिंग ट्रॅकचा आपण व्ह्यूह रचला होता त्यामध्ये आपणच फसलो. त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये आपण चार विरुद्ध एक अशी मात खाल्ली. परंतु तत्पूर्वी न्युझीलँड विरुद्ध भारतीय भूमीवर भारतात आपल्याला वाईट वॉश खावा लागेल असे कोणाही स्पोर्ट्स एक्स्पर्टचे अनुमान नव्हते.. दुर्दैवाने आपल्याला तीन विरुद्ध शून्य असा वाईट वॉश खावा लागला. यामध्ये रोहित आणि विराट यांचे अपयश यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये विराटचे एक शतक सोडले तर त्याच्याकडनं फारसे काही आपल्या पदरी लागले नाही. रोहित हा इम्पॅक्ट प्लेयर आहे. त्याला सरासरी वरती तोलू नये असे कोच गौतम गंभीर याचे म्हणणे असते. त्यामुळे तो टेस्ट क्रिकेट सुद्धा टी ट्वेंटी किंवा वनडे स्टाईल खेळतो परंतु क्रिकेट विश्लेषक म्हणून मला ते योग्य वाटत नाही. त्यामुळे त्याला कुठेतरी पासिंग मार्क्स द्यावे लागतील. परंतु आगामी दोन वर्षातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप करता हे दोघेही खेळाडू निष्प्रभ ठरतील या अनुमानातून जर का त्यांना बसवले जाणार असेल तर ते अत्यंत योग्य आहे असे माझे स्पष्ट म्हणणे आहे.
  आगामी इंग्लंड दौऱ्या करता शुभमन गिल सारख्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या तरुण खेळाडूवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे. अजित आगरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी  हा निर्णय योग्य घेतला असल्याचे माझे म्हणणे आहे. सोबत यशस्वी जयस्वाल, करुण नायर, नितीश रेड्डी सारखे प्रतिभावान फलंदाज आहेत. इंग्रजी मधल्या प्रचलित म्हणीनुसार " वी हॅव नथिंग टू लूज..." यानुसार या नवख्या टीमला ब्रिटिशांना नडायचे आहे! भिडायचे आहे!
   आज ब्रिटिश माध्यमांच्यात एक बातमी अत्यंत ठळक मथळ्याने झळकते आहे.. की आपण सिलेक्ट केलेल्या टीमच्या एकूण आंतरराष्ट्रीय सेंचुरीज या एकट्या जो रूट च्या सेंचुरीपेक्षा कमी आहेत. असो!!! मला त्या मूर्ख ब्रिटिश माध्यमांना हे सांगायचं आहे की तुम्ही जुनी खोडं घेऊन खेळताय पण आम्ही तरुण रक्त घेऊन खेळतोय... त्यामुळे कशाला हवेत वलयांकित खेळाडू?.... इंग्लंडचा हा दौरा भारतीय क्रिकेटला आगामी लिजंड्स देणार आहेत....


तुमची मते मला
mandar.donde@gmail.com वर नक्की कळवा..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.