भाजपा नगरसेवकांचा तिव्र आंदोलनाचा इशारा !
सिटी बेल लाइव्ह / खांदा कॉलनी #
खांदा कॉलनी सेक्टर 1 येथील शेलार हॉस्पिटलकडून होत असलेल्या रुग्णांच्या आर्थिक पिळवणुकी विरोधात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ब सभापती व नगरसेवक संजय भोपी, माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील आणि नगरसेविका कुसुम गणेश पाटील तसेच खांदा कॉलनी मधील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उग्र जनआंदोलनाची भूमिका घेतली आहे.
खांदा कॉलनीमधील शेलार हॉस्पिटल हे सुरूवातीपासूनच रुग्णसेवेच्या नावाखाली सातत्याने स्वतःचा खिसा भरत आहेत. सध्याच्या कोरोना काळातदेखील या हॉस्पिटलने निर्लज्जपणे लूटमार चालूच ठेवली आहे. या हॉस्पिटलच्या अंदाधुंद व मनमानी तसेच हेकेखोरपणाच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींना येत आहेत. हॉस्पिटलमधील रिकामे बेड भरण्यासाठी रुग्णांना अनाठायी भीती दाखवून भरती करत अवाजवी दर आकारून आर्थिक पिळवणूक करताना यांना थोडीही लाज वाटत नाही. योग्य तपासणी न करता कमिशन मिळत असलेल्या चाचण्या करत आठ दहा दिवस थातुरमातुर उपचार केले जातात. एखादा कोरोना बाधित रुग्ण असल्यास योग्य वेळी चाचणी न झाल्यामुळे त्याचा वेळ वाया जाऊन आजार गंभीर होऊन हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे त्यास अतिदक्षता विभागात भरती व्हावे लागते प्रसंगी जीवितास धोका निर्माण होत आहे. तसेच रुग्णांकडून पैसे घेण्यासाठी धाक - दडपशाहीचा मार्ग अवलंबला जात आहे. शेलार हॉस्पिटलच्या या जाचक मनमानी कारभाराविरोधात कारवाईची मागणी मा. आयुक्त साहेब तसेच संबंधित सर्व शासकीय यंत्रणा यांना करण्यात आली आहे. शेलार हॉस्पिटलविरोधात जर काही तक्रार असेल तर खांदा कॉलनी मधील नगरसेवक यांना संपर्क साधावा ही विनंती.
संजय भोपी, नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती
कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये खुप साऱ्या रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहे आणि ते निर्दयी डॉक्टर बिनधास्तपणे आपल्या बिलाची रक्कम रुग्णांच्या नातेवाईकांकडून उकळत आहेत तरी या होणाऱ्या अन्यायकारक लुटमारीला कुठे तरी लगाम बसलाच पाहिजे.
सिताताई पाटील, नगरसेविका






Be First to Comment