Press "Enter" to skip to content

शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या ७३व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या मु.- आवरे, ता.- उरण, जिल्हा – रायगड येथे नव्याने स्थापन झालेल्या शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

यावेळी शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जीवनपट फलकास पुष्पचक्र अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी आवरे ग्रुप ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच निराबाई पाटील यांनी दीप प्रज्वलन केले.

यावेळी ‘कल्लाकार’ युट्यूब वाहिनीचे संयोजक सुयश म्हात्रे यांनी शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व व अफाट कार्यकर्तृत्वावर आधारित निर्माण केलेल्या लघुपटाचे सभागृहात सादरीकरण केले.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले तसेच रक्तदान शिबिरातील रक्तदात्यापैकी रविंद्र पाटील यांनी प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. संस्थेचे विश्वस्त व संस्थेच्या विक्रोळी येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले वडीलबंधू शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील अफाट कार्याचा आढावा घेतला. ग्रामीण भागात शालेय शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली पाहिजे हे त्यांनी बाळगलेले स्वप्न आवरे येथे शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे महाविद्यालयाची स्थापना करून पूर्ण केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या वरिष्ठ महाविद्यालयात आर्टस, सायन्स, कॉमर्स व आयटी या शाखांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयात कला, क्रीडा, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात असे प्रतिपादन त्यांनी केले.

या रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान देऊन रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव रामनाथ म्हात्रे, विश्वस्त मेघा म्हात्रे, विश्वस्त डॉ. समृद्धी मोरे, खजिनदार डॉ. सुखदा चिराटे, अंजली म्हात्रे, विद्या म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, सेवानिवृत्त वनाधिकारी महादेव गावंड, राजश्री गावंड, माजी उपसरपंच चंद्रकांत गावंड, ज्ञानेश्वर गावंड, दर्पण मोरे, सुजित चिराटे, प्राचार्य विलास शेणवी, माजी उपप्राचार्य अजित आडकर, उपप्राचार्य वैदेही म्हात्रे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग यांची उपस्थिती होती.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान संचालित स्वस्तिक रक्तपेढी, कामोठे, नवी मुंबई व संस्थेच्या रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजनचे प्राचार्य सुभाष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी मोलाचे सहकार्य केले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य
सुविद्य गावंड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद केणी यांनी तर आभार प्रदर्शन शिवहरी गावंड यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.