Press "Enter" to skip to content

उलवे पुष्पक नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेचे सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न 

 रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभली उपस्थिती 

पनवेल (हरेश साठे) उलवे पुष्पक नोडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची उभारणी करण्यात येत असून, या विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज (०१ जून )संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांची पत्नी शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते. 

सेक्टर २४ मधील प्लॉट क्रमांक २४० येथे झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. मनोज भुजबळ, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजय भगत, विभागीय अध्यक्ष विजय घरत, अमर म्हात्रे, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, न्हावे सरपंच विजेंद्र पाटील, चंद्रकांत भोईर, स्वप्नील ठाकूर, ज्योत्स्ना ठाकूर, योगिया भगत, अनंता ठाकूर, जयवंत देशमुख, अरुण घरत, निलेश खारकर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, विभागीय पीआरओ बाळासाहेब कारंडे, संतोष गुजर, मांडवी गुरुजी, राजेश खारकर, किशोर पाटील, शैलेश भगत, मीनाक्षी पाटील, निकिता खारकर, सपना पाटील, गणेश सोमासे, रुपेश मोहिते, रंजना घरत, रंजना पाटील, जागृती म्हात्रे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांनी सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सौ. शकुंतला ठाकूर या थोर समाजसुधारक जनार्दन भगत साहेब यांच्या कन्या असून, लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अर्धांगिनी म्हणून त्यांची सामाजिक कार्यात भक्कम साथ लाभली आहे. सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत या दाम्पत्याने समाजसेवा हाच जीवनधर्म मानला आहे. तर गोरगरीब व वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदैव प्रयत्नशील राहून शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या पुढाकाराने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था बनली आहे. मात्र, त्यांच्या मनात आजही मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेबद्दल अतूट प्रेम आणि निष्ठा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विकासासाठी सातत्याने मोलाचे योगदान मिळत आले आहे.सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची स्थापना हे रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात एक महत्त्वाचे पाऊल आहे. या ठिकाणी सीबीसीई माध्यमाचे विद्यालय आहे परंतु काही कुटुंबातील विद्यार्थ्यांचा कल मराठी माध्यमाकडे असतो त्यामुळे या भागात मराठी माध्यमाच्या शाळेची आवश्यकता होती हे लक्षात घेऊन संस्थेने मराठी माध्यमाचे विदयालय उभारण्याचा निर्णय घेतला.  उलवे नोडसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागात गुणवत्तापूर्ण मराठी माध्यम शिक्षणाची गरज लक्षात घेऊन हे विद्यालय उभारण्यात येत आहे. या विद्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षणाबरोबरच संस्कार, मूल्यशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारे हे विद्यालय असणार आहे. 

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती वेळोवेळी पुढे येत असतात. पण समाज बदलायचा असेल, शिक्षणात गुणवत्तेचा पाया घालायचा असेल, तर फक्त काम करणं पुरेसे नसते, त्यामागे दूरदृष्टी, कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड लागते. अशा गुणवत्तेचा संगम म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर. रामशेठ ठाकूर यांनी समाजहिताचे भान ठेवून, पुढील पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून आपल्या कार्याला नेहमी व्यापक आणि शाश्वत दिशा दिली. त्यांच्या कार्याची खरी ओळख म्हणजे शिक्षणक्षेत्रात त्यांनी उभारलेले अमूल्य योगदान आहे. रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या सामाजिक दृष्टीकोनाची आणि शैक्षणिक बांधिलकीची साक्ष देणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, क्रीडा व सांस्कृतिक सुविधा या साऱ्यांचा समावेश असलेल्या शैक्षणिक संकुलांची उभारणी हे त्यांच्या कार्याचं मूर्त स्वरूप आहे. रामशेठ ठाकूर यांचा उद्देश नेहमी स्पष्ट राहिला आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी केवळ इमारती उभारल्या नाहीत, तर मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या संस्था घडवल्या. त्यांच्या कार्याने हजारो विद्यार्थी घडले, अनेक कुटुंबांचे जीवनमान उंचावले आणि संपूर्ण समाजात सकारात्मक बदलांची नांदी घडवून आणली. आज रामशेठ ठाकूर यांचे नाव उच्चारले की, एक कणखर नेतृत्व, सामाजिक बांधिलकीची जाण आणि परिवर्तनाची आस असलेला व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभं राहते. त्यांचं कार्य म्हणजेच आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे.

– रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.