Press "Enter" to skip to content

सनातन राष्ट्र स्थापनेसाठी नवी दिशा आणि जागृती निर्माण करणारा शंखनाद !


प्रस्तावना : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात देशभरातून आलेले साधक, विचारवंत, संत आणि राष्ट्रनिष्ठ नागरिक यांनी एकत्र येत ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचा संकल्प पुन्हा एकदा दृढ केला. शतचंडी यज्ञ, धर्मध्वज आरोहण, युद्धकलेची प्रात्यक्षिके, संतांचे मार्गदर्शन आणि विचारवंतांचे राष्ट्ररक्षणविषयक विचार या सर्वांनी महोत्सवाला केवळ आध्यात्मिक नव्हे, तर वैचारिक आणि कृतीशील अधिष्ठान दिले. या शंखनादाने साधकांच्या मनात ‘वैयक्तिक साधनेसमवेतच समाजरक्षणासाठी आवश्यक असलेली समष्टी साधनाही महत्त्वाची आहे’, ही जाणीव निर्माण केली. विशेषतः युवाशक्तीला शौर्य, स्वसंरक्षण आणि देशभक्ती यांचा नवा मंत्र मिळाला. आज देश सांस्कृतिक संघर्षाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा काळात हा महोत्सव म्हणजे एक चैतन्यदायी ज्योत आहे, जी प्रत्येक हिंदूंच्या मनात धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांसाठी सज्ज रहाण्याचे तेज जागवत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून चालू झालेले विचारमंथन हेच खरे याचे फलित आणि रामराज्याच्या दिशेने उचललेले दृढ पाऊल ठरणार आहे !

समाजातील व्यापक प्रभावाचे प्रतीक ! : या महोत्सवाला २३ देशांतील ३० हजारांहून अधिक साधक आणि हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह, गोव्याचे आरोग्यमंत्री श्री. विश्वजित राणे, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. दामोदर नाईक आदी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पू. देवकीनंदन ठाकूर, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज, तसेच म्हैसूरचे खासदार श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके आदी मान्यवर उपस्थित होते. सनातन धर्माच्या कार्यक्रमांना राजकीय पाठिंबा मिळणे, हे त्याच्या समाजातील व्यापक प्रभावाचे प्रतीक आहे.

सनातन राष्ट्र स्थापनेसाठीची वैचारिक बैठक ! : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात विचारवंत, संत, धर्मगुरु यांच्या भाषणांतून सनातन विचारांचे राष्ट्र स्थापन करण्यासाठीची वैचारिक बैठक मजबूत झाली. उपस्थितांनी कृतीशील राष्ट्रनिष्ठ साधनेसाठी कटिबद्ध रहाण्याचे संकल्प केले. युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमुळे युवक-युवतींमध्ये स्वसंरक्षण, शौर्य आणि सज्ज रहाणे याची जाणीव निर्माण झाली. शास्त्रासमवेतच शस्त्रसज्जता हेही धर्मरक्षणाचे महत्त्वाचे अंग असल्याचे अधोरेखित झाले. गोरक्षण, गुरुकुल व्यवस्था, पारंपरिक विधी, सनातन आचारधर्म यांची आवश्यकता पुनः अधोरेखित झाली. अनेक सहभागी संस्थांनी पुढील कृतीसाठी सहकार्य आणि समन्वय यांचे आराखडे सिद्ध करण्याचा निर्धार केला. ‘सुदर्शन न्यूज’सारख्या माध्यमांनी ही चळवळ व्यापक स्तरावर पोचवण्याचा संकल्प केला. सोशल मिडिया आणि वृत्तमाध्यमे यांतून महोत्सवाची चर्चा चालू झाली, ज्यातून ‘हिंदु राष्ट्र’ ही धारणा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न दिसत आहे.

जनतेच्या मनातील ध्येय ! : या महोत्सवाने एक गोष्ट सिद्ध केली की, ‘सनातन राष्ट्र्र’ ही संकल्पना आता केवळ विचारधारा न रहाता, ती जनतेच्या मनातील ध्येय बनत आहे; कारण जिथे न्यायालयात ज्ञानवापी, श्रीकृष्ण जन्मभूमीचे खटले चालू आहेत, वक्फ बोर्डाच्या असीमित शक्तींवर गदा आणणारे सुधारक विधेयक संसदेत संमत झाले आहे, काही राज्यांनी समान नागरी कायदा लागू करण्यास आरंभ केला आहे, हे सर्व सनातन राष्ट्र्राच्या दिशेने झपाट्याने पडत असलेली पावलेच आहेत.

छत्रपतींच्या शौर्याची आणि रणनीतीची आठवण ! : गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र्र शंखनाद महोत्सवा’चा एक ठळक भाग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ आणि प्राचीन शस्त्रांचे प्रदर्शन. हे शस्त्रप्रदर्शन पहातांना प्रत्येक उपस्थिताच्या मनात छत्रपतींचे शौर्य आणि रणनीती यांची आठवण जागृत झाली. आजच्या काळात जेथे आंतरराष्ट्रीय आणि धार्मिक कट्टरपंथी भारतावर आक्रमणे करत आहेत, तेथे छत्रपतींच्या रणकौशल्याचा आणि शौर्याचा आदर्श ‘सनातन राष्ट्र्र’ स्थापन करण्यासाठी बळ देणारा ठरला.

हिंदवी स्वराज्याच्या नवयुगाचा आरंभ ! : सनातन संस्था सनातन हिंदु संस्कृतीचे संवर्धन आणि राष्ट्र्ररक्षण यांसाठी सतत प्रयत्नशील आहे. भारताचा विजय व्हावा आणि पृथ्वीवरील एकमेव सनातन राष्ट्र्र असलेल्या भारताचे रक्षण व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या पावन भूमीत ‘शतचंडी यज्ञा’चे आयोजन केले होते. येथे झालेला वैचारिक शंखनाद म्हणजे हिंदूंना आत्मविश्वास, दिशा आणि उद्दिष्ट मिळवून देणारा रणघोष ठरला. हा केवळ महोत्सव नसून हिंदवी स्वराज्याच्या नवयुगाचा आरंभ आहे.

प्रभु श्रीरामांच्या धर्मयुद्धाचा संदेश ! : बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. पहलगाम येथेही धर्म विचारून हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. अशा वेळी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आपल्याला प्रभु श्रीरामांच्या धर्मयुद्धाचा संदेश देतो. धर्म, धैर्य आणि एकतेनेच राष्ट्र आणि संस्कृती वाचू शकते. आजच्या काळातील आतंकी आणि कट्टरवादी यांच्यामुळे निर्माण झालेले धोके तोंड देण्यासाठीही या दिव्य उर्जेची आवश्यकता भासते. जी ऊर्जा या महोत्सवातून मिळाली.

      हॉलंडमधील भविष्यवेत्ता पीटर हर्कोस यांनी ‘भारतात सनातन धर्माचा शंखनाद होईल आणि अध्यात्मामुळे तो विश्वगुरु बनेल’, अशी भविष्यवाणी केली होती. या महोत्सवामुळे गुरुदेवांच्या संकल्पाने कार्य सिद्धीस जाणार आहे आणि ‘भारत लवकरच विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे’, याची आता सर्वांना निश्चिती झाली आहे. सनातन राष्ट्र्राचा हा दिव्य मार्ग प्रकाशमान रहावा आणि भारत हा धर्मध्वज उंचावत जागतिक पातळीवर पराक्रमशाली राष्ट्र म्हणून उभा रहावा, यासाठी प्रत्येक हिंदु सज्ज व्हावा, हीच गुरुचरणी प्रार्थना !
  • श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था. (संपर्क : ७७७५८५८३८७)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.