Press "Enter" to skip to content

काळाधोंडा येथील ग्रामस्थांच्या घरात पाणी

मे मधील पहिल्याच पावसात चाणजे ग्रामपंचायती मधील गटारांमधून ग्रामस्थांच्या घरात सांडपाण्याचा पुर

तृप्ती भोईर : उरण


उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील काळाधोंडा गावात रविवार दिनांक २५ मे रोजी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने काळाधोंडा ग्रामस्थांच्या घरात गावातील गटारे तुंबल्यामुळे रस्ते, गल्ली बोळ तुटुंब भरून थांबले नाहीत तर अनेक घरात पाणी शिरले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे नागरिकांच्यात संतापाची लाट उसळली आहे.

खोलगट भागात व सखल भागातही साचलेल्या पाण्यामुळे लहान मुले, महिला ,जेष्ठ नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले. गावात आलेले हे पाणी गटारातील सांडपाणी मिश्रीत असल्यामुळे हे पाणी दुर्गंधीयुक्त व रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गेली कित्येक वर्षे गटारव्यवस्थेकडे पंचायतीचे दुर्लक्ष आहे, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये अनेकदा तक्रार करूनही गटारांची वेळच्यावेळी साफसफाई होत नाही. यावर्षी देखील पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली नसल्याने हि पुरस्थीती निर्माण झाली आहे. असा आरोप काळाधोंडा ग्रामस्थांनी केला आहे.

काळाधोंडा गावातील रहिवासी मिलिंद भोईर, नितीश पाटील, हर्षद पाटील, वैभव पाटील, विलास भोईर यांच्या घरात पाणी शिरल्याने घरात रोगराई ची भीती निर्माण झाली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान मुलांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे. घरातील सामानाचे नुकसान तसेच हे घाणीचे पाणी उपसून काढावे लागले.

“ग्रामपंचायतीने वेळेवर गटार सफाई केली असती तर हि वेळ आली नसती, दरवर्षी हिच परिस्थिती निर्माण होत आहे प्रशासन फक्त आश्वासन देते, कृतीत काहीच करत नाही. “

रहिवासी जितेश पाटील

“घराजवळ साचलेले पाणी घरात घुसून अन्नधान्य भिजले, लहान मुले, वृध्दांना याचा त्रास होत आहे. याकरिता प्रशासनाने तातडीने आम्हाला मदत करावी.”

रहिवासी मिलिंद भोईर
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.