पेण, ता. 26 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील मौजे दिव गावाच्या हद्दीतील गट नंबर १२५ (ब) या जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी पेण भूमी अभिलेख कार्यालयाकडून टाळाटाळ होत असल्याने येथील संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे तक्रार अर्ज शेतकरी यांनी जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे केले आहे.
तालुक्याच्या दिव मधील गट नंबर १२५ (ब) या जमीन क्षेत्राबाबत तालुका भूमी अभिलेख या कार्यालयाकडे जमीनीची हद्द निश्चित करण्यात यावी याकरिता येथील शेतकरी रत्नाकर रघुनाथ म्हात्रे यांनी अर्ज केला व यातील शासकीय फी सुद्धा त्यांनी आकारली त्यानंतर १७ एप्रिल २०२५ रोजी कार्यालयातील गोडे मॅडम आणि अन्य दोन सहकारी यांनी त्या ठिकाणी येऊन रोव्हर द्वारे मोजणी करून घेतली व पुन्हा आठ दिवसांनी याच जागेची मोजणी निश्चित करण्यात येईल असे सांगण्यात आले.मात्र आठ- दहा दिवसांनी शेतकरी यांनी कार्यालयात चौकशी केली असता गोडे मॅडम यांनी सांगितले की सदर गट नंबर १२५ (ब) चा क्षेत्र इतरत्र दाखविण्यात येत आहे.असे सांगितल्याने पेण भूमि अभिलेख कार्यालयाकडून आमची दिशाभूल करण्यात येत असून जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने याबाबत कारवाई करण्यात यावी असे निवेदन वजा तक्रारी अर्ज शेतकरी रत्नाकर रघुनाथ म्हात्रे यांनी जमाबंदी आयुक्त पुणे महाराष्ट्र यांच्यासह कोकण विभागीय आयुक्त, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी पेण तसेच तहसीलदार यांना दिले आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार आम्ही नकाशाची पाहणी केली असता जुना नकाशा आणि नवीन नकाशामध्ये फरक आढळून येत आहे. गट नंबर १२५ च्या लगत १३० गट नंबर आहे.परंतू जागा आणि त्यांचा ताबा बरोबर आहे.मात्र नकाशात चूक आढळून येत असल्याने सदर व्यक्तीने वरिष्ठ पातळीवर अपील सादर करून यातील दुरुस्ती करून घ्यावी.
अनिल बाविस्कर – उप अधिक्षक भूमी अभिलेख पेण




Be First to Comment