

अन्यथा ५ जून नंतर शिवसेना आंदोलन करणार – प्रसाद भोईर
पेण, ता. २४ (वार्ताहर) : महाराष्ट्रात पावसाची सुरुवात ख-या अर्थाने पुढील महिन्यापासून होत असताना मात्र आता पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने याचा फटका लघुउद्योगांसह कारखानदारांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २३ रोजी महावितरण कार्यालयावर धडक देत आक्रमक भूमिका घेतली.
यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांना सांगितले की विजेच्या लपंडावामुळे ग्राहक मेटाकुटीला आला असून भरमसाठ येणारे वीज बिल ग्राहक प्रामाणिकपणे भरत असतो मात्र कंपन्यांना बिलांबाबत काहीच देणे घेणे नसते त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतानाही आपले अधिकारी वर्ग त्याकडे कानाडोळा करतात त्यातच कोकण आपत्ती समीकरणांतर्गत या विभागातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करायचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.अनेक वीजवाहिन्या उघड्या असल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे.सर्व मागण्या होत असताना जीर्ण झालेले विजेचे पोल, फॅब्रिकेशनची नादुरूस्त, खराब झालेल्या तारा, तक्रार निवारण करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी, नवीन वीज जोडणी कमीत कमी खर्चात, जळालेले किंवा बंद पडलेले मीटर मोफत बदलून द्यावेत यासह वीजवाहिन्या तातडीने भूमिगत करण्यात याव्यात अशा मागण्यांचे निवेदन देऊन वीज ग्राहकांच्या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा ५ जूननंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल इशारा देण्यात आला आहे.
यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, समन्वयक नरेश गावंड, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, महिला संघटिका दर्शना जवके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, सुधिर ढाणे, भगवान पाटील, विभाग प्रमुख दीपक पाटील, नंदू मोकल, हिराजी चौगुले, जयराज तांडेल, चेतन मोकल, युवा सेना अधिकारी निलेश म्हात्रे, विनोद म्हात्रे, शिवाजी म्हात्रे, गंगाधर पाटील रवींद्र मोकल आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Be First to Comment