Press "Enter" to skip to content

तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी  

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल विधानसभा क्षेत्रातील तळोजा एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वायू व जलप्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, या परिसरातील रासायनिक आणि मत्स्य प्रक्रिया उद्योगांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून त्यांच्यासाठी नवीन झोन तयार करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

त्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार उदय सामंत यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हणते आहे कि, पनवेल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत तळोजे एमआयडीसी असून त्यामध्ये अभियांत्रिकी कंपन्यांसोबतच अनेक रासायनिक (केमिकल) तसेच काही मस्त्योद्योग प्रक्रिया कंपन्या आहेत. या कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर वायू तसेच जलप्रदुषण होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तळोजा एमआयडीसीच्या चोहोबाजूंनी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यांना या प्रदुषणाचा खूप त्रास होत आहे. याबाबत मी सातत्याने पत्रव्यवहाराद्वारे, बैठकांद्वारे हा विषय शासनाकडे मांडत आलो आहे. या रासायनिक कंपन्यांमधून विशेषतः रात्रीच्या वेळी घातक वायु हवेत सोडले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदुषित होत असून नागरिकांना श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे या सर्व रासायनिक कंपन्यांकडून रसायनमिश्रित दुषित पाणी तसेच सांडपाणी हे या परिसरांतील नद्यांमध्ये सोडले जाते, त्यामुळे नद्यांमधील जैवविविधता धोक्यात आली आहे. 

तसेच मत्स्योद्योग प्रक्रिया कंपन्यांतर्फे देखील जल, वायु प्रदुषण होत आहे. या प्रक्रिया उद्योगांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधी तसेच वायू प्रदूषणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विविध ऋतुंमध्ये उन्हाळा, पावसाळा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या मत्स्यप्रक्रिया उद्योगांतर्फे प्रदूषण होते. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पनवेल व आजूबाजूच्या परिसरांत सध्या खूप मोठ्या प्रमाणांत विकासकामे चालू आहेत, तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठ मोठ्या गृहसंकुलांची कामे चालू आहेत. या सर्वामुळे या परिसरातील लोकसंख्या खूप वाढणार आहे. त्यादृष्टीने या जल, वायू प्रदुषणावावत कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक असून नागरिकांचे जगणे सुसह्य झाले पाहिजे त्यामुळे रासायनिक तसेच मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे तळोजा एमआयडीसी येथून स्थलांतर करून त्या उद्योगांकरिता लोकवस्तीपासून दूर वेगळा झोन स्थापन करावा आणि तेथे या सर्व उद्योगांचे स्थलांतर करण्यात यावे, आणि त्यासाठी याबाबत निर्णय करण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करावे, असेही त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या या निवेदनात नमूद केले आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.