

जाणीव कर्तुत्वाची…….. आपल्या माणसांची……. असा एक आगळावेगळा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ दिघाटी यांचेकडून रविवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला. गावातील नवीन पिढीला आधुनिक शिक्षणाची माहिती, संधी, स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करणे या संकल्पनेतून श्री. किरण पाटील, श्री रोहिदास शेडगे, श्री गजानन पाटील, मा. सरपंच अमित पाटील, श्री नरेश ठाकूर, श्री किशोर पाटील, बंटी पाटील, श्री मनोज पाटील, श्री गजानन ठाकूर, अविनाश म्हात्रे, राकेश पाटील, सुरेश पाटील अशा अनेक तरुणांनी एकमताने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी त्यांचा एक दिवसाचा पगार या गाव कार्यासाठी देण्याचे ठरवले व त्याप्रमाणे अनेकांनी या उपक्रमास आर्थिक मदत केली. येत्या पाच – दहा वर्षांमध्ये गावातील किमान 50 मुले /मुली एमपीएससी, यूपीएससी, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, व इतर उच्च पदावरील सरकारी अधिकारी म्हणून काम सांभाळून गावाचं नाव उज्वल करतील असा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
गावातील जे नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर कामाला आहेत त्यांची पूर्ण माहिती तसेच जे -जे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतलेले आहे जसे की आयटीआय, ग्रॅज्युएशन, इंजीनियरिंग, इ. अशी सर्व माहिती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीमध्ये एखादी जागा (व्हॅकन्सी ) निघाली तर त्या जागेसाठी व्हॅकेंसी साठी पात्र असणाऱ्या गावातील उमेदवाराला त्याची माहिती देता येईल आणि त्याच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देता येईल, असे धोरण गावकऱ्यांनी ठेवून वाटचाल करायचे ठरविले आहे. या कार्यक्रमांमध्ये गावातील सरकारी व खाजगी निवृत्त ज्येष्ठ कामगारांचा तसेच सरकारी व सन्मानाच्या पदावर नोकरी करणाऱ्या गावकऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला व त्याचबरोबर दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमांमध्ये कृषी अधिकारी श्री दिनेश ढालपे यांनी शेती विषयी योजनांबद्दल गावातील नागरिकांना सविस्तर माहिती दिली. सौ. ज्योती कोंढवल मॅडम ग्रामसेविका दिघाटी यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक हास्य प्रबोधनकार श्री संजीवन दादा म्हात्रे यांनी दहावी बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शैक्षणिक बाबतीत कोणतीही अडचण आल्यास आपण सर्वतोपरी मदत करू असेही श्री संजीवन दादा म्हात्रे यांनी सांगितले. जर आपल्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी यूपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्याची तयारी दर्शवली पुण्याचे जे क्लासेस घेतात त्यांना आपल्या विभागामध्ये बोलवून शिबिर आयोजित करू आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आवाहन श्री संजीवन दादा म्हात्रे यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये गावातील पहिली महिला पोलीस, सनदी लेखपाल (CA) होमगार्ड, आर्किटेक्ट, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून गावकऱ्यांना विशेष मदत करणाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये श्री संजीवन दादा म्हात्रे, दिनेश डालपे सर कृषी अधिकारी, सौ ज्योती कोंढवाल मॅडम ग्रामसेविका, सौं. रजनी ताई हिरामण ठाकूर- सरपंच, सुनील गावंड- उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, गावाचे पहिले सरपंच श्री भाऊ कृष्णा पाटील, प्रख्यात कीर्तनकार सदानंद महाराज, रो. सुरेश शेडगे एलआयसी एजंट व असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ठाणे व रायगड जिल्हा रोटरी, एडवोकेट शंकर ठाकूर गुरुजी, उद्योजक श्री एम व्ही पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते.




Be First to Comment