Press "Enter" to skip to content

पाणी तसेच रस्ता या मूलभूत सुविधांसाठी आदिवासींचा जलसमाधी आंदोलन

तातडीने पाणीपुरवठा सुरू करत रस्त्याच्या कामाला दोन दिवसांत सुरुवात करणार ; तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या सुवर्ण मध्य मुळे आंदोलन स्थगित

पेण, ता. 14 ( वार्ताहर ) -: पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी आदिवासी वाडीवरील ग्रामस्थांना रस्ता आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. याबाबत अनेकवेळा संबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होत होते. अखेर आज या प्रशासनाला जागे करण्यासाठी येथील आदिवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि नंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेणच्या भोगावती नदीमध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केले. मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.

पेण तालुक्यात अनेक आदिवासी वाड्या आहेत. यापैकी जवळपास सत्तर टक्के आदिवासी वाड्या या एक ना अनेक समस्यांपासून वंचित राहिलेल्या आहेत.आदिवासी समाजाची शैक्षणिक पात्रता कमी असल्याचा फायदा घेत येथील प्रशासन या बांधवांच्या विकासात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होता. मात्र सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी या बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पाणी आणि रस्ते या मूलभूत गोष्टी मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला मात्र तरीदेखील त्यांना यश मिळत नव्हते, अखेर त्यांनी आज भोगावती नदीपात्रात आदिवासी बांधवांना सोबत घेऊन जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पेणचे तहसिलदार तानाजी शेजाळ यांनी आंदोलनकर्ते आणि संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रविंद्र पाचपोर यांनी तातडीने काम करून आजच्या आज यंत्रणा राबवून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तर रस्त्याच्या प्रश्नाबाबत देखील तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्या दालनात तातडीची मीटिंग झाल्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी डी. एम. पाटील यांनी देखील येत्या दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्याने आजचे जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या प्रथम क्रमांक घोषणेचा पंचनामा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या दृष्टीने कोणत्या खात्याला प्रथम क्रमांक दिला असेल तर तो सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे. मात्र आज याच सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या भागाला रस्ता मिळावा यासाठी पत्रव्यवहार करून देखील तो रस्ता मिळत नसल्याने आज या आदिवासी बांधवांवर जलसमाधी आंदोलन करण्याची वेळ आली आहे यातूनच मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अव्वल नंबर देण्याच्या निर्णयाचा पंचनामा झाला आहे. मिळालेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने पाणी आणि येत्या दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पाणी आणि बांधकाम विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोकू.

संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

आम्ही आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. पाणीपुरवठा बाबत तातडीने पाणी पुरविण्याचा निर्णय झाला आहे. तसेच रस्त्याच्या बाबत बांधकाम विभागाने दोन दिवसात कामाची प्रक्रिया सुरू करतो असे सांगितले आहे, तरीदेखील वरीष्ठ स्तरावर चर्चा करून या आदिवासी बांधवांचा प्रश्न मार्गी लावला जाईल.

तानाजी शेजाळ, तहसिलदार – पेण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.