
उलवे, ता. ७ : गरिबातला गरीब शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर अण्णांनी केली. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ आणि शुभांगीताई घरत यांचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये झाले आहे त्यामुळे ते आज जागतिक पातळीवर लीलया वावरताना दिसतात. आपल्या ताटातील अर्धी भाकरी भुकेलेल्याला द्या ही कर्मवीर अण्णांची शिकवण महेंद्रशेठ आणि शुभांगीताई प्रत्यक्ष जगतात. आपले शिक्षण ‘रयत’मुळे झाले याची जाणीव ठेवून राज्यातील अतिदुर्गम भागात असणार्या शाळा-महाविद्यालयांसाठी महेंद्रशेठ घरत यांनी आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेला दोन कोटींच्या आसपास देणगी दिली आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासारखेच ‘रयत’ला सढळ हस्ते मदत करणारे म्हणून महेंद्रशेठ घरत यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वच क्षेत्रांत त्यांच्या दातृत्वाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्र घरत यांनी पारगाव-दापोली हायस्कूलला जवळ जवळ ५५ लाखांची देणगी दिली आहे.
शुभांगीताई घरत यांचे पारगाव-दापोली येथील ‘रयत’च्या हायस्कूलमध्ये शिक्षण झाले आहे त्यामुळे माजी विद्यार्थिनी म्हणून पारगाव-दापोली हायस्कूलसाठी त्यांनी केलेली मदत उल्लेखनीय आहे.
त्यांच्या दातृत्वाची दखल रयत शिक्षण संस्थेने घेतली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाप्रसंगी माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे महेंद्रशेठ आणि शुभांगीताई घरत या उभयतांचा शुक्रवारी (ता. ९) सत्कार करण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




Be First to Comment