Press "Enter" to skip to content

प्रभुदास भोईर यांचा शेकापक्षाला राम राम

मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत केला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

पनवेल/ प्रतिनिधी.
शेतकरी कामगार पक्षाचे ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांनी शेकापक्षाला राम राम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री अशोक शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी त्यांनी भाजपा मध्ये आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.प्रभुदास भोईर हे महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे राज्य प्रमुख देखील आहेत.
ट्रान्सपोर्ट सेल चे राज्य प्रमुख म्हणून प्रभुदास भोईर यांची कामगिरी अत्यंत नेत्रदिपक राहिली आहे. त्यांच्या माध्यमातून साजरा होणारा दत्त जयंती महोत्सव हा पनवेल तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावाजला जातो. माथाडी कामगार, जनरल कामगार,ट्रान्सपोर्टर बांधव तसेच कळंबोली येथील लोखंड व पोलाद बाजारातील लाखो कामगार यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रभुदास भोईर अहोरात्र झटत असतात.विविध लोकाभिमुख कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रभुदास भोईर वंचित आणि दुर्लक्षित घटकांना सक्षम करण्याचे कार्य करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. विविध मंदिरे, समाज मंदिरे, सर्वधर्म समावेशक धार्मिक स्थळे उभारण्यासाठी अण्णा सढळ हस्ते मदत करतात.

गेले कित्येक दिवस त्यांच्या सजग लोकाभिमुख कार्याला पक्षाकडून पाठिंबा मिळत नसल्याबद्दल त्यांच्या मनात खंत वाढू लागली होती. राज्यभरातील ट्रान्सपोर्टर बांधव, माथाडी व जनरल कामगार यांना मोठ्या पातळीवर पाठबळ द्यायचं असेल तर सत्ता केंद्रामध्ये शब्द प्रमाण असणाऱ्या नेतृत्वाचा हात आपल्या डोक्यावर पाहिजे अशी भावना प्रभुदास भोईर यांच्या मनात रुंजी घालत होती. आपल्याला असा आधार फक्त आणि फक्त रामशेठ ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टीच देऊ शकतात याची मनोमन खात्री पटल्यामुळे त्यांनी पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्याचे माहिती,तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा मफलर घालून व पुष्पगुच्छ प्रदान करून प्रभुदास भोईर यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर, उरण चे आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन भाई पाटील,परेश शेठ ठाकूर,रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड आस्वाद उर्फ पप्पू शेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपल्या भावना प्रकट करताना प्रभुदास भोईर म्हणाले की लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वरती विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याची साहेबांनी पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली आहे. मला अपेक्षा आहे की मी आणि माझ्या कार्यकर्त्यांची देखील ते अशीच काळजी घेतील. तसेच मी आमदार प्रशांत दादा ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांना आश्वासित करू इच्छितो की आपण माझ्यावर जी जबाबदारी द्याल ती मी आणि माझे कार्यकर्ते यशस्वी केल्याशिवाय शांत बसणार नाही.

प्रभुदास भोईर यांच्यासोबत राज्य उपाध्यक्ष अतुल घरत,खजिनदार भुषण म्हात्रे, माजी नगरसेविका प्रिया विजय भोईर, कार्याध्यक्ष विजय भोईर, पनवेल तालुका अध्यक्ष प्रभाकर नाईक, रायगड जिल्हाध्यक्ष अनिल शुक्ला, गोरख धुमाळ सदस्य ग्रामपंचायत डेरवली, विश्वनाथ शेळके सदस्य ग्रामपंचायत डेरवली, सुप्रसिद्ध उद्योगपती दिनेश पाटील, अशोक खंडू म्हात्रे कोन ग्रामपंचायतचे उपसरपंच, गुरुनाथ ठाकूर,
उरण तालुका अध्यक्ष विशाल घरत, वाहतूक संघटनेचे प्रवक्ता विवेक खाडे, शिवश्री सुजित खाडे, कैलास स्वामी, राकेश जाधव, सुजित भगत, धनाजी भोईर, उत्तम बागडे, छायाताई जाधव, शहाजी कोटे,
लोणावळा विभाग अध्यक्ष जालिंदर शेलार, कर्जत तालुका अध्यक्ष गणेश कांबरी, पेण तालुका अध्यक्ष प्रतीक म्हात्रे, कळंबोली शहराध्यक्ष संतोष शिंदे, खारघर शहर अध्यक्ष मोहसीन शेख, खांदा कॉलनी अध्यक्ष पंकज कुमार पांडे, कामोठे शहराध्यक्ष मनीष भगत, गोवंडी मानखुर्द अध्यक्ष सोहेल व्यंकट रेड्डी, नेरूळ शहर अध्यक्ष राजेश गोळे, उलवे विभाग अध्यक्ष संजय नाईक, नावडे विभाग अध्यक्ष दर्शन म्हात्रे, कुर्ला विभाग अध्यक्ष चंद्रकांत कोळी, करंजाडे शहराध्यक्ष अंकुश देसाई, पनवेल शहर अध्यक्ष सतीश आचार्य, अध्यक्ष महेश कांबळे यांच्यासह हजारो समर्थकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
चौकट

रॉयल एंट्री…. अण्णा.. बस नाम ही काफी हैं

हजारो समर्थकांच्या सह प्रभुदास भोईर पक्षप्रवेश सोहळ्यासाठी दिमाखदार एन्ट्री घेत दाखल झाले. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे आशिष शेलार पक्षप्रवेश सोहळ्यासाठी थांबणार नव्हते. त्यामुळे प्रभुदास भोईर यांचा पक्षप्रवेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. परंतु प्रभुदास भोईर यांच्यासोबत उपस्थित असणारे जिल्हा व तालुका अध्यक्ष, अन्य पदाधिकारी, माथाडी कामगार,महिला यांनी रॅलीच्या माध्यमातून जयघोष करत मार्केट यार्ड येथे प्रवेश केला आणि प्रभुदास भोईर यांची मसल पावर दाखवून दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.