

महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्या हस्ते वाघेश्वर मंदिराचे भूमिपूजन
उलवे, ता. २१ : आपण कितीही मोठे झालो, कितीही उच्चशिक्षित झालो, मोठ्या शहरात राहिलो, जगाच्या कानाकोपऱ्यात गेलो तरी गावाशी आणि मातीशी असलेली आपली नाळ कधीही तोडू नका. कारण अंतिम श्वास घेतल्यानंतर अंत्यसंस्कार गावात होतात, याची जाण प्रत्येकास हवी. म्हणूनच मी माझे शेलघर गाव पंचक्रोशित नव्हे तर राज्यात आदर्श गाव म्हणून माॅडेल ठरावे, असा शेलघरचा विकास केला आहे, लवकरच शेलघरमध्ये भव्यदिव्य साई मंदिर उभे राहील, त्या मंदिराची रचना अतिशय देखणी आणि कळस तर गावात असलेल्या सर्व बंगल्यांच्या उंच असेल. वैभव पाटील यांनी हाती घेतलेले वाघेश्वर मंदिराचे बांधकाम निश्चित चांगले होण्यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करीन, असे पेण-कळवा येथे वाघेश्वर मंदिराच्या भूमिपूजनावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले. शुभांगीताई घरत आणि महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते वाघेश्वर मंदिराचे भूमिपूजन झाले.

यावेळी महेंद्रशेठ घरत पुढे म्हणाले, ग्रामस्थांनो, तुम्ही वडिलोपार्जित जमिनी विकू नका, लवकरच येथील जमिनीला चांगला भाव मिळेल, मोठी मागणी असेल, आता जरा कळ काढा, पुढच्या पिढीला या जमिनीची गोंडस फळे मिळतील, असा माझा विश्वास आहे. आम्हीसुद्धा आम्हाला आलेले साडेबारा टक्के जमिनीचे प्लॉट विकले नाहीत, आज त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला आहे. गावकऱ्यांनो, भांडण-तंटे विसरा, गावाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी राजकीय चपला बाहेर ठेवा. मी स्वतः निवडणुकीपुरते राजकारण करतो, जनसेवेशी काया झिजवावी, हेच माझे व्रत आहे.
यावेळी वैभव पाटील म्हणाले, माझ्या वडिलांची इच्छा होती, हे मंदिर व्हावे, पण त्यांच्या हयातीत मला बांधता आले नाही, याची खंत वाटते, पण महेंद्रशेठ घरत यांच्या भक्कम पाठिंब्याने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने निश्चितच मंदिराचे बांधकाम मार्गी लागेल, असा विश्वास आहे.
यावेळी कळव्याचे सरपंच सतिश पाटील, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल,किरीट पाटील, उत्तम कोळी,आनंद ठाकूर, लंकेश ठाकूर, सुभाष पाटील,यशवंत ओवळेकर, किरण कुंभार, अरुण म्हात्रे, अजित ठाकूर,राजेंद्र भगत, राजीव पाटील, विलास पाटील, कैलास पाटील, मनोज पाटील, जिवन पाटील, संतोष पाटील, अविनाश पाटील, मारुती पाटील, शिवाजी पाटील, वासुदेव पाटील तुळशीदास पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment