तातडीच्या उपाययोजनेची गरज
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
मुंबई – गोवा महामार्गावरील नागोठण्यातील गजबजलेला नाका असलेल्या हायवेनाका येथील उड्डाण पुलाच्या खालील बाजूस ठेकेदार कंपनीकडून अनेक त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच या उड्डाण पुलाखालून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनाची वर्दळ या पुलाखालून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महामार्ग कामाचे ठेकेदार असलेल्या कंपनीने यावर तातडीची उपाययोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
नागोठण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या अशा हायवेनाका येथे महाकाय उड्डाणपूल उभारण्यात आले आहे. मात्र असे असले तरी या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूकडील भरावाचे काम मोठ्या प्रमाणात अपूर्ण अवस्थेत आहे. या उड्डाण पुलाच्याच पूर्वेकडील बाजूस स्थानिक वाहनांसाठी एक सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. या सर्व्हिस रोडवर जाण्यासाठी वाहन चालकांना या उड्डाण पुलाखालूनच जावे लागत आहे. मात्र या सर्व्हिस रोडवर जाण्यासाठी वळण घ्यावे लागत असल्याने वळणाच्या ठिकाणी पुरेशी जागा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळेच या उड्डाण पुलाखालून सर्व्हिस रोडवर जाताना वळणावर समोरून आलेले वाहन दिसत नाही. त्यातच या सर्व्हिस रोडचा वापर सध्या बाहेरील वाहनचालकही मोठ्या प्रमाणात करीत असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीने या वळणाच्या ठिकाणी असलेल्या नाल्यात अजून एक पाईप टाकून वाहनांना वळण घेण्यासाठी अधिकाधिक जागा तयार करण्याची उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
याशिवाय या उड्डाण पुलाखालील बाजूस कामाच्या वेळेस शिल्लक राहिलेल्या टोकदार सळ्या “आ” वासून उभ्या असल्याने त्या सुध्दा अपघाताला आमंत्रण देत आहेत. त्यामुळेच ठेकेदार कंपनीने याप्रकरणी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांतून होत आहे.
दरम्यान ठेकेदार कंपनीचे अधिकारी जयदेव ठाकूर यांना उड्डाण पुलाखालची धोकादायक परिस्थिती प्रस्तुत प्रतिनिधीने स्वतः जागेवर जावून दाखवून दिली असता उड्डाण पुलालगतच्या नाल्यात अजून एक पाईप टाकून त्या ठिकाणचे वळण रुंद करण्याबरोबरच पुलाखालील बाजूस असलेल्या सळ्या लवकरच काढण्यात येतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.






Be First to Comment