Press "Enter" to skip to content

पोलादपूर शहरातील दहीहंडीची नियमबध्द नियोजनाची परंपरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवतांच्या गोपाळकाल्याची दहीहंडी फोडली पंचांच्या साक्षीने

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (प्रतिनिधी)

शहरातील श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही खाजगी आणि सार्वजनिक दहीहंडया फोडण्याचे एक नियमबध्द नियोजन करण्यात आले असून दरवर्षी या नियोजनानुसारच दहीहंडी फोडण्याची संधी शहरातील 12 नगरांना देण्यात येत असते. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचे सेवेकरी स्व.सुंदरशेठ पालकर यांचे नातू शैलेश वसंत पालकर यांनी पंचांच्या साक्षीने दहीहंडी फोडली.

यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या दहीहंडी उत्सवाला मर्यादा आल्याने श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानचे सेवेकरी स्व.सुंदरशेठ पालकर यांचे नातू शैलेश वसंत पालकर यांच्याहस्ते यंदा देवस्थानची हंडी देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडीक, सचिव विजय ग. पवार, खजिनदार शंकर दरेकर, ज्येष्ठ सेवेकरी रामभाऊ भूतकर तसेच पुजारी संतोष गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलादपूर शहरातील प्रमुख दहीहंडी फोडण्यात आली. तत्पूर्वी, ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथांना श्रीफळ अर्पण करून देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडीक यांनी कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचे रक्षण करण्यासह हा उत्सव मान्य करून घेण्याचे आवाहन केले.

विविध शहरात आणि गावांमध्ये मोठमोठया रकमा आणि दहीहंडी फोडण्यासाठी जीवघेणी स्पर्धा दिसून येत असताना पोलादपूर शहरात महत्व ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान उत्सव मंडळातर्फे ही हंडी कोणत्या नगरातील गोविंदांनी फोडायची याबाबत आधीच नियोजन केले जाते. राजकीय पक्षांची चिन्हे अथवा व्यक्तींच्या नावाने बनियान अथवा टी-शर्ट परिधान करू नये, नशापाणी करू नये, गोविंदांवर कुठल्याही प्रकारचे घातक रंग टाकू नये अशा प्रकारचे नियम निश्चित करण्यात आलेल्या पोलादपूर शहरातील दहीहंडी फोडण्याचा हा उत्सव एकाच वेळी सर्व नगरातील गोविंदांच्या सहभागाने पूर्ण होतो. मात्र, फोडण्यात आलेल्या प्रत्येक दहीहंडी सोबत बक्षिसाची रक्कम श्री काळभैरवनाथ देवस्थान पोलादपूर यांच्या पंचकमिटी कडे जमा करण्यात येते. नियमबध्द नियोजन असलेला पोलादपूर शहंरातील हा दहीहंडी गोविंदा उत्सव दरवर्षी शांततापूर्ण उत्साहात साजरा होत असतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.