Press "Enter" to skip to content

बंदी असूनही मखरीसाठी थर्माकोलचा वापर

सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) :

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने गतवर्षी प्लास्टिक आणि थर्माकोल या नष्ट न होणाऱ्या प्रदूषणकारी घटकांवर बंदी घातली. यामुळे सदर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना काही प्रमाणात फटका बसला. मात्र, प्रदूषण रोखण्यात नक्कीच मदत झाली.

दरम्यान, यावर्षी लॉकडाऊन काळात पुन्हा प्लास्टिकचा वापर वाढला असून गणेशोत्सवाच्या मखरीसाठी कर्जत तालुक्यात थर्माकोलचा वापर सुरू झाला आहे. यामुळे पर्यावरणाला पुन्हा धोका होऊ शकतो, असे पर्यावरण तज्ज्ञ सांगतात.

कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. यामुळे अनेकांना फटका बसला असून उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही जणांनी रेल्वे सेवा ठप्प असल्याने तात्पुरता स्वरूपात काही उद्योग सुरू केले आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने अनेकांनी सणवारांना पूरक व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र सरकारी यंत्रणाही काहीशी कानाडोळा करीत असल्याने अनेकांनी अनधिकृत व्यवसाय सुरू केल्याचे दिसते.

सणासुदीला घरांची डागडुजी, रंगरंगोटी केली जाते. त्याचप्रमाणे गणेशोत्सव तोंडावर आल्याने त्याची घरोघरी तयारी सुरू झाली आहे. मात्र, याचा काही व्यवसायिकांनी गैरफायदा घेतला असून चक्क थर्माकोल विक्री केली जात आहे.

मागीलवर्षी राज्य सरकारने शासनादेश काढत प्लास्टिक आणि थर्माकोल या प्रदूषणकारी पदार्थांवर बंदी घातली. याला सामान्य जनतेतून सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. मात्र, कर्जत तालुक्यात यंदा कोरोना महामारीमुळे सरकारी यंत्रणा सैल पडताच चोरट्या मार्गाने थर्माकोल विक्री सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत सामान्य जनतेतून प्रश्न केले जात असून अशा प्रदूषणकारी पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सरकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू. तसेच, स्थानिक प्राधिकरणालाही याबाबत आम्ही आदेश देऊ.

-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.