सिटी बेल लाइव्ह / माथेरान (मुकुंद रांजाणे)
जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद असलेले माथेरानकरांना तीन दिवस पिण्याच्या पाण्याविना काढावे लागल्याने येथील जलप्राधिकरणाच्या कारभाराविषयी सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे .
माथेरान पर्यटन नगरीस येथील शार्लोट लेक येथून पाणी पुरवठा होत असतो पण मागील काही वर्षांमध्ये येथे झपाट्याने पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने हे पाणी कमी पडू लागले होते त्याकरिता नेरळ येथील उल्हासनदीचे पाणी पंपांद्वारे माथेरानपर्यंत नेहून पाणी टंचाईवर मात करण्यात आली पण हे पाणी नेताना माथेरानयेथील शार्लोट लेक येथील पंपिंग स्टेशन कडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले.
पूर्वी येथे विज नसलीतरी जनरेटरच्या सहाय्याने पाणी पंपिंग करून सर्वत्र वितरित केले जात होते पण नेरळहून येणारे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येऊ लागल्याने शार्लोट लेक येथील कार्यालय बंद पडू लागले त्याच्यामुळे येथे असलेली यंत्रसामुग्री व जनरेटरच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने येथील एकएक सुविधा बंद होऊ लागल्या ज्याचे विपरीत परिणाम आता माथेरानकरांना भोगावे लागत आहेत.
नेरळ येथील पाणी पुरवठा खंडित झाल्यास व शार्लोट लेक येथील वीज अनियमित झाल्यास माथेरान करांना पिण्याच्या पाण्यास मुकावे लागते येथील लाखो रुपयांचे जनरेटर वापराविना गंजले आहेत जिल्ह्यात सर्वात जास्त पाणी बिल माथेरानमध्येच आकारले जाते तरीही अनेकवेळा वीज नसली कि येथील पाणी पुरवठा खंडित होत असतो असे वर्षातून दोन तीन वेळा होत असते त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यास जल प्राधिकरण अपयशी ठरले आहे .
माथेरानमध्ये व्यावसायिक व घरगुती अशी जवळपास तेराशे नळजोडण्या आहेत त्याचे मासिक उत्पन्न सरासरी वीस लाखाच्या आसपास होते म्हणजे जोडण्याच्या हिशोबाने येथे उत्पन्न जास्त आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन पाच सहा लाख पकडले तरी जलप्राधिकरणाकडे मोठी रक्कम उरत आहे पण नेरळ ते माथेरान ह्या दरम्यान असलेली मोठी पंपिंग स्टेशन व त्याला लागणारी वीज ह्याच्या देयकांची रक्कम बारा लाखाच्या आसपास आहे व ह्यामुळेच हि पाणी योजना माथेरान करांना महाग ठरत आहे जल प्राधिकरण हि विजेची बिले माथेरानकरांकडून जाडा भाडे लावून वसूल करीत आहे व ह्याच पंपिंग स्टेशनवरून अनेक पाणी जोडण्यादेण्यात आल्या आहेत.
त्यांना मात्र त्यात सूट मिळत आहे तसेच शासनाकडून वीज बिल मध्ये सवलत मिळण्यासाठी प्रयत्न न करता माथेरानकरांना वेठीस धरले जात आहे. इतके करूनही माथेरानकरांना मात्र दिलासा नाहीच पाणी बिले भरण्यास विलंब झाल्यास पाणी जोडणी कापल्या जातात .
मागील तीन दिवसांपूर्वी जमिनीखालून गेलेल्या वीजवाहिनी खराब झाल्याने शार्लोट लेक येथील पंपिंग स्टेशन बंद पडले तर ह्याच दरम्यान जुम्मापट्टी येथील नेरळ येथून होणारी पंपिंग स्टेशन हि पम्पमधे बिघाड झाल्याने बंद झाल्याने माथेरानकरांना होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता.
येथील मर्यादित मालवाहतूक व्यवस्था लक्षात घेता हा पुरवठा पूर्ववत करण्यास उशीर लागला त्यामुळे भरपावसात माथेरानकरांचे पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले होते येथील कर्मचारी मर्यादित सुविधांच्या आधारे नागरिकांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात पण यांत्रिक आघाडीवर साथ मिळत नसल्याने त्यांचा नाईलाज होत आहे.
अजूनही शार्लोट लेक येथील वीजपुरवठा सुरु झालेला नसून नेरळ येथून येणारे पाणी मात्र जलप्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून सुरु केल्याने आज तीन दिवसांनंतर माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे .
माथेरान येथील शार्लोट लेक येथील जनरेटरची दुरुस्ती व्हावी किव्हा येथे नवीन जनरेटर बसविण्यात यावेत अशी मागणी आता माथेरानमध्ये जोर धरू लागली असून त्यावर योग्य उपाय योजना केली गेली नाहीतर माथेरानकर आंदोलनांचा पवित्रा घेणार आहेत






Be First to Comment