
कळंबोलीत गोलू नावाच्या गुंडाची दहशत ; कळंबोली पोलिसांसमोर नवे आव्हान
कळंबोली सध्या गोलू नावाच्या गुंडाची दहशत पहावयास मिळत आहे. या गुंडावर कळंबोली तळोजा तसेच इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हा गुंड कळंबोलीत दहशत माजवत असून कळंबोली पोलीस या गुंडाचा बंदोबस्त करतील का ? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत.
या गोलूचा नवा कारनामा सध्या कळंबोलीत गाजत आहे. मुंबई ते म्हसवड या रूटला तू ट्रॅव्हल्स का सुरू केल्या याचा राग मनात धरून म्हसवड रूटवर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या विजयालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या मालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीचा म्होरक्या गोलू असण्याचे सांगण्यात येत आहे.
अनिकेत किसन सरगर असे हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रॅव्हल्स मालकाचे नाव आहे. अनिकेत सरगर यांच्या स्वतःच्या मालकीच्या 15 ट्रॅव्हल्स आहेत. यापैकी काही ट्रॅव्हल्स या मुंबई ते कराड, कराड ते हैदराबाद आणि मुंबई ते जत या मार्गावर दररोज चालतात. मात्र अनिकेत सरगर यांनी नव्याने मुंबई ते म्हसवड या मार्गावर आपल्या बस सुरू केल्या. यावर सातारा सांगली बस संघटनेचे अध्यक्ष शंकर विरकर यांनी स्वतः अनिकेत सरगर याला फोन करून तू या मार्गावर तुझ्या ट्रॅव्हल्स का सुरू केल्या तुला असे करणे महागात पडेल अशी धमकी दिली. आणि त्यानंतर वारंवार अनिकेत सरगर यांना धमकीचे सत्र सुरूच राहिले. वारंवार अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्यानंतर अनिकेत सरकार यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली मात्र कळंबोली पोलीसांनी या प्रकरणी अ दाखल पात्र गुन्ह्याची नोंद करून याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांच्या हा हलगर्जीपणा अनिकेत सरगर यांना महागात पडला. पोलिसात तक्रार केली तरी आपले काहीही वाकडे झाले नाही यामुळे धमकी देणाऱ्यांना अजूनच चेव चढला.
26 डिसेंबरला अनिकेत सरगर यांनी स्वतःच्या मालकीची विजयालक्ष्मी ट्रॅव्हल्स पुन्हा मुंबई म्हसवड ला जाण्यासाठी कळंबोली मॅकडोनाल्डसमोरील रस्त्यावर लावली त्याच वेळी काही गुंडांनी ट्रॅव्हल्स मालक अनिकेत सरकार आणि त्यांच्या मॅनेजरला मारहाण केली. या टोळीचा मोरक्या हा गोलू नावाचा नव्याने उदयास येणाऱ्या गुंड असून त्याच्या हातात प्राणघातक हत्यारे असल्याचे पाहून अनिकेत सरगर आणि कसाबसा आपला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला आणि जवळच असलेल्या शिवसेना शाखे शेजारील तीन मजली इमारतीमध्ये लपून कसाबसा आपला जीव वाचवला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करत ते ज्या ठिकाणी लपले होते त्याची माहिती पोलिसांना दिली. काही वेळानंतर पोलीस त्या ठिकाणी येऊन त्यांनी सरगर यांची सुटका केली.
या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर देखील कळंबोलीत डॉन बनू पाहणाऱ्या या गोलू चा कायमचा बंदोबस्त कळंबोली पोलीस करतील का ? या गोलु ला कोणत्या राजकीय नेत्याने आपल्या पंखाखाली घेऊन त्याला वारंवार वाचविण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.



Be First to Comment