पिरवाड बीचच्या समुद्र किनारी उरण सामाजिक संस्था करणार आंदोलन
सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यात सुसज्ज आणि अद्ययावत रूग्णालय उभारले जावे या मागणीसाठी उरण सामाजिक संस्था गेली दहा वर्षे प्रत्येक वर्षी 2 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण आयोजित करते. त्याचसोबत विविध स्तरांवर पत्रव्यवहार आणि सतत पाठपुरावाही संस्थेने केला आहे आणि आताही पाठपुरावा सुरु आहे.
उरण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून आणि तत्कालीन आमदारांच्या प्रयत्नामुळे उरण येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी भूखंड मंजूर झाला आहे. परंतू मागील पाच वर्षांत मंत्रालयीन पातळीवर अनेक बैठका होऊनही रूग्णालय उभे राहू शकले नाही. उरण सामाजिक संस्थेने याच आणि इतर मागण्यांसाठी दोन वर्षांपूर्वी मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्याची गंभीर दखल घेऊन स्वतः मा. मुख्य न्यायमूर्तिंनी जेएनपीटीला 45 दिवसांत उरण मधील टाऊनशिप येथील रूग्णालयात ट्राॅमा केअर सेंटर उभारण्याचे आदेश दिले आणि तसे जेएनपीटीकडून प्रतिज्ञापत्र घेतले. तेथे ट्राॅमा सेंटर आले पण योग्य साधनसामुग्री नसल्याने ते निरुपयोगी ठरत आहे.
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अद्ययावत कोविड सेंटरची आवश्यकता आहे. पण उरणात साधे एक व्हेंटिलेटर सुद्धा मिळत नाही. ही उरण ची अवस्था आहे. जेएनपीटी अत्यावश्यक सेवा सदरात असल्याने येथील तरूणांना नाईलाजाने तेथे कामाला जावे लागते. त्यामुळे गावागावांत कोरोनाचा प्रसार होत आहे. म्हणून तालुक्यातील जनतेचा आरोग्यावरील खर्च येथील कंपन्यांनी करायला हवा. तसेच जेएनपीटी किमान 15 दिवस बंद ठेवण्यात यावे.यासह इतर तत्सम मागण्यांसाठी उरण सामाजिक संस्थेतर्फे येत्या 15 ऑगस्ट रोजी पिरवाड बीचच्या समुद्र किनारी आंदोलन करण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी रायगड, जेएनपीटी चेअरमन, तहसिलदार उरण यांना दिलेली आहे.
सदर आंदोलन मंत्रालयासमोर करण्याचा विचार होता. परंतु लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सदरहू आंदोलन उरण येथील पिरवाडी बीचच्या समुद्र किनार्यावर 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण तेथून मंत्रालय समोर आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली आहे.
सदरहू आंदोलनात जनतेने सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून, शासनाचे नियम पाळून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
सुधाकर पाटील-अध्यक्ष
दिनेश घरत-कार्याध्यक्ष,
संतोष पवार-सरचिटणीस,
रूपेश पाटील-उपाध्यक्ष,
प्रा. राजेंद्र मढवी-उपाध्यक्ष
सौ सीमा घरत-महिला आघाडी प्रमुख उरण सामाजिक संस्था आदी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती यावेळी असणार आहे.






Be First to Comment