Press "Enter" to skip to content

रोह्यातील बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आक्रमक

कोपर्डीच्या घटनेला लवकर न्याय दिला असता तर तांबडीमधे अशी घटना घडली नसती

मुख्यमंत्री,गृहमंत्र्यानी पीडित मुलीच्या कुटुंबियांची दखल न घेतल्याने नाराजी

सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)


तांबडी घटनेतील अत्याचार व खून प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा सोमवारी प्रचंड आक्रमक झाला.राज्याच्या बहुतेक जिल्ह्यातील समन्वयकांनी रोहा येथे महत्वपूर्ण बैठक घेत पुढील भुमिका स्पष्ट केली. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी अद्याप का भेट दिली नाही,असे म्हणत नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली, तर तपासात दिरंगाई झाल्यास, दुर्लक्ष झाल्यास थेट मंत्रालयावर मराठा क्रांती मोर्चाचा भव्यदिव्य मोर्चा निघेल. याची शासनाने दखल घ्यावी असा इशारा राज्याचे समन्वयक संभाजी पाटिल यांनी यावेळी दिला.

राज्याच्या अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व पदाधिका-यांनी सोमवारी तांबडी गावातील पीडितेच्या प्रकरणावर आक्रमक भुमिका घेतली. झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत अनेकांनी स्पष्ट भुमिका व्यक्त केली. अल्पवयीन पीडितेच्या अत्याचार प्रकरणात नक्की आरोपी किती, पोलीस प्रशासनाकडून अजून काही कागदोपत्रे दिली जात नाहीत, तांबडीची क्रूर घटना ठरवून असावी असे म्हणत १२० ब अन्वये चौकशी करण्यात यावी. प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा नेवू, मराठा समाजाची नव्याने ताकद दाखविण्याची वेळ आली आहे,अशा भावना स्थानिक पदाधिकारी व समन्वयकांनी व्यक्त केल्या.

जिल्ह्यातील तांबडी येथिल अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून झाल्याची घटना घडली आणि सबंध राज्यात खळबळ उडाली. त्या घटनेवर सर्वकश समाज मुख्यतः मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून सबंधीत प्रकरण फास्ट ट्रकवर चालावे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, सरकारी वकील नेमून जलद करावे अशी मागणी सर्वच स्तरातून झाली.

तांबडी प्रकरणावर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला. अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समनवयकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर सोमवारी अहमदनगर, कोल्हापूर, सातारा,उस्मानाबाद, सांगली, लातूर, मुंबई, नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वकांनी रोह्यात महत्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीला राज्य समनवयक विरेंद्र पवार, संभाजी पाटील, रामभाऊ गायकवाड, महेश डोंगरे, सुनिल नागणे, विनोद साबळे,सुनील पाटील,राजू गायकवाड,संतोष पवार,अभिजित पाटील,मंदार जाधव,भैय्या पाटील, आबा पाटील,सुभाष सात्वेकर,विलास उतेकर,अमित ठोमसे,अशोक मरगणे,उदय धुमाळ,योगेश मोरे,संतोष नानवरे,रमेश आंब्रे, स्थानिक अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख, नितीन परब,रायगड जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा अंबरे, हेमंत देशमुख, समीर शेडगे, महेश सरदार,प्रशांत देशमुख,अनंत देशमुख,संदीप सावंत,सुहास येरुणकर,राकेश साजेकर, व पदाधिकारी उपस्थित होते.

रायगडमधील तांबडीची घटना भयानक आहे. भगिनीला न्याय मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटणे, निवेदन देणे फार उपयोगाचे नाही, थेट मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा नगरचे समन्वयक संभाजी पाटील यांनी दिला.

अत्याचारात अजून कोणी मास्टरमाइंड आहे का, तसा संशय येत आहे, तपासावर आम्ही समाधानी नाहीत. तपास योग्य दिशेने झाले पाहिजे. तसेच हा चोरीचा प्रकरण नाही. बलात्कार हत्या केल्याचे आहे, मराठा विरुद्ध आदिवासी वाद वाढवू नका असा इशारा रायगडचे समन्वयक विनोद साबळे यांनी आदिवासी नेत्यांना दिला.

तांबडी अत्याचार प्रकरण हे दुसरी कोपर्डीची घटना वाटावी असेच आहे. पीडित कुटुंब भयभीत आहे, त्यांच्यावर दबाव आणले जाते, दडपण आहे. पोलीस उपविभागीय आधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्याकडेच तपास असायला हवे होते. आरोपीला जातधर्म नाही. आदिवासी विरुद्ध मराठा संघर्ष नको, आदिवासी शब्द टाळू या, असे बैठकीत ठरले. त्यानंतर सर्व पदाधिका-यांनी तांबडी येथे जाऊन पीडित कुटुंबाचे सात्वंन केले. दुसरीकडे कोपर्डी घटनेत दोषींना फाशी दिली असती तर तांबडी येथे अशी घटना घडली नसती,राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घटनास्थळी भेट द्यायला हवी होती,अशी प्रतिक्रीया समन्वयकांनी दिली.कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्या,या घटनेत काही षडयंत्र असल्यास या प्रकरणाचा मूळ सूत्रधार कोण आहे याचाही शोध घ्यावा असे दरम्यान समन्वयकांकडून सांगण्यात आले.

दरम्यान तांबडी प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा प्रचंड आक्रमक झाल्याचे सोमवारी समोर आले.राज्यातील सर्वच समन्वयक रोह्यात आल्याने तांबडी अत्याचार प्रकरणावर नेमकी काय भुमिका घेतली जाते ? याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.