कर्जत – दहिवली गावाच्या इतिहासात मोठी भर, भौगोलिक नकाशा करण्यात यश
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली गाव हे तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या गावाच्या इतिहासात भर टाकणारा अत्यंत महत्वाचा ठरणारा भौगोलिक नकाशा तयार करण्यात इतिहास अभ्यासकांना यश आले आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू असून अनेक महत्वाच्या बाबी समोर येतील.
कर्जत तालुक्यातील दहिवली गाव इतिहासाच्या दृष्टिकोनातून प्राचीन आहे. दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेल्या कोंडाणे लेणीकडे जाणारा पुरातन रस्ता सुद्धा ह्याच गावातून गेलेला आहे. अकराव्या शतकात म्हणजे शिलाहार काळात ह्या गावाचा उल्लेख "दोहनपल्ली" म्हणून आढळतो. मध्ययुगात म्हणजे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात इथली सुभेदारी पिंपुटकर कुटुंबाकडे आली आणि दहिवली गावाला सुभ्याचे महत्त्व प्राप्त झाले. सुभेदारीच्या दृष्टिकोनातून आजचा पूर्ण कर्जत तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील काही भाग पिंपुटकर सुभेदारांच्या अंतर्गत होता. त्यांचे निवासस्थान दहिवली गावात असल्यामुळे इथे प्रचंड वर्दळ असे. त्यामुळे तुरळक वस्ती असलेल्या ह्या गावाला व्यापक रूप देण्यात आले. आजही गावाच्या केंद्रस्थानी असलेला त्यांचा राहता वाडा त्यांच्या वंशजांनी जपला आहे. ह्याच गावाच्या भूगोलात भर टाकणारा अत्यंत महत्त्वाचा नकाशा बनवण्यात इतिहास अभ्यासक व संशोधक सागर माधुरी मधुकर सुर्वे आणि वाणिज्य शाखेतील अकरावीच्या विद्यार्थिनी कु. नेत्रा गणेश कनोजे ह्यांना यश आले आहे.
मागील काही महिने सागर सुर्वे व नेत्रा कनोजे दहिवली गावाच्या वेशींसबंधी अभ्यास करत असताना त्यांना जुन्या दस्तऐवजांमध्ये वेशींचे उल्लेख मिळाले ते अभ्यासून तात्काळ त्यांनी गावाच्या वेशींवरील राऊळे कागदावर जोडली असता श्रीयंत्राशी साधर्म्य असणारा नकाशा तयार झाला. दहिवली गावाची ग्रामदेवता श्रीमहालक्ष्मी केंद्रस्थानी असल्यामुळे ह्या नकाशाला अत्यंत महत्त्व आहे. गावाच्या इतिहासात भर टाकणारे हे मोठे यश त्यांना मिळाले आहे. हा नकाशा बनवण्यासाठी ईशांत संतोष मालुसरे ह्या नववीच्या विद्यार्थ्याची विशेष मदत लाभली.
सतराव्या शतकातील जुन्या कागदपत्रांत उल्लेख मिळालेले व दहिवली गावाच्या वेशींवर स्थापन केलेले तांदळे आजही अस्तित्वात असल्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो व त्यामुळे हा नकाशा अधिकाधिक परिपूर्ण बनवायचा प्रयत्न आम्ही करू शकलो तसेच वेशीवरील तांदळांचा अधिक अभ्यास करून बऱ्याच गोष्टी नव्याने समोर येतील असे नेत्रा कनोजे ह्यांचे मत आहे.
दहिवली गावच्या वेशीसंबंधी सागर सुर्वे व नेत्रा कनोजे ह्यांचे अधिक संशोधन सुरू असून भविष्यात जुन्या कागदपत्रांमधून अनेक बाबी समोर येतील जेणे करून गावचा इतिहास लोकांपर्यंत पोहचेल, असे मत त्यांनी मांडले आहे.
Be First to Comment