फातिमा मातेची 88 वी तीर्थयात्रा उत्साहात
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत मधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर ( चर्च ) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी 13 ऑक्टोबर किंवा त्या नंतर येणाऱ्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. यंदा 88 वी फातिमा मातेची तीर्थयात्रा रविवारी 15 ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाली. देश – विदेशांतून आलेल्या भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. तसेच अन्य धर्मियांनी देखील उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले.
कर्जत रेल्वे स्थानका नजीक असलेल्या चर्चच्या परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी फातिमा मातेच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी फादर ऑलवीन मिस्किटा, फादर फ्रान्सिस बाप्टिस, फादर डेनिस डिसोझा, आदी उपस्थित होते. चर्च चे प्रमुख फादर लुईस कजार यांच्या उपस्थितीत बिशप ऑलविन डिसिल्व्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बँड पथकाच्या तालावर फातिमा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ख्रिश्चन धर्मियांबरोबरच अन्य धर्मीय भाविकांनीही जागोजागी मातेच्या पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला.
त्यानंतर व्यासपीठावर दीप प्रज्वलित करून एका विशेष समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. फादर लुईस कजार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात चर्च बद्दलची माहिती सांगितली. त्यानंतर प्रमुख व्याख्याते बिशप ऑलविन डिसिल्व्हा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ‘मारिया सर्वसामान्य व्यक्ती होती, देवाने निवडलेली व्यक्ती होती. करुणायुक्त हृदय, धैर्यवान, वचनबद्ध व्यक्ती होती तिच्या जीवनाचे महत्व आपण जाणून घेतल्यास आपल्या मध्ये नक्की आध्यत्मिक परिवर्तन शक्य आहे.’ असे स्पष्ट केले. दिवसभरात अन्य समाजाच्या भाविकांनी सुद्धा फातिमा मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
दुपारी आरोग्य दान प्रार्थना, ख्रिश्त शरीर आराधना व प्रार्थना केली. या यात्रेसाठी सकाळपासूनच आदिवासींनी काकड्या, आळकुंड्या, टरबूज आदी तसेच ग्रामीण भागात पिकणाऱ्या भाज्या आणल्याने मुंबईकर ख्रिश्चन बांधवांनी ते घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सिल्व्हर फ्रान्सिस, पॉल फ्रान्सिस, ऍड. सनी डिमेलो, विल्सन पानपाटील, विक्टर मास्करेन्स, नेल्सन फ्रांसिस, फ्रान्सिस जेनिफर, सविवो फ्रान्सिस, एडविन सुई, तमा आंची आदीं सह देश विदेशातून असंख्य ख्रिश्चन बांधव भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment