कर्जत तालुक्यात जलजीवन मिशनचा सावळागोंधळ…
तीन ठेकेदारांना टाकले काळया यादीत
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत तालुक्यात केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन मधून नळपाणी योजना राबविण्यात येत आहेत. त्यातील अनेक योजनांची कामे रखडली आहेत तर अनेक योजना बंद पडल्या आहेत. मात्र त्याचे कोणतेही सोयर सुतक ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी वर्गाला नाही. लाखोंच्या खर्चाच्या या नळपाणी योजना यांची वाट लावणाऱ्या ठेकेदारांना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चाप लावला आहे. कर्जत तालुक्यातील तीन नळपाणी योजनांचे ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात आले असून आणखी 20 नळपाणी योजनांचे ऑडिट मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावे. अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारचे 50 टक्के आणि राज्य सरकारचे अनुदानावर या योजना राबविण्यात येत आहेत.
जलजीवन मिशन जी योजना केंद्र सरकारने प्रत्येक व्यक्तीच्या घरात नळाचे पाणी देण्यासाठी आणली आहे. त्यानुसार गेली दोन वर्षे ही योजना राबविण्यात येत असून कर्जत तालुक्यात 121 योजना जल जीवन मिशन मधून मंजूर करण्यात आल्या आहेत. या योजना राबविताना ग्रामपंचायत स्तरावर आणि नंतर जिल्हा परिषद स्तरावर बनविलेल्या आराखड्यांतून योजना मंजूर झाल्या आहेत. कर्जत तालुक्यातील 121 नळपाणी योजनांपैकी 14 योजनांची कामे पावसाळा सुरू झाल्यापासून पूर्णपणे थांबली आहेत. त्या ठिकाणी ठेकेदार आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्यात एकमत होत नसल्याने तालुक्यातील 14 नळपाणी योजना बंद आहेत तर तालुक्यातील नऊ नळपाणी योजना यांची कामे संबंधित कामांचे कार्यादेश मिळविणाऱ्या ठेकेदारांकडून सुरू करण्यात आलेल्या नव्हत्या. त्या नळपाणी योजनांची कामे सुरू व्हावीत यासाठी कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयात मे 2023 मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी बैठक घेवून अडचणी सोडवून योजना राबविण्यास सुरुवात करावी. यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र वर्षभरात संबंधित नऊ नळपाणी योजनांपैकी कामे पूर्णपणे ठप्प असल्याने रायगड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जबाबदारी स्वीकारली. नंतर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा आढावा घेवून रखडलेल्या नळपाणी योजना यांची कामे सुरू व्हावीत. यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्यानंतर देखील संबंधित ठेकेदार आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्याकडून सहाय्य मिळत नव्हते. शेवटी वर्षभराच्या कार्यकाळात नळपाणी योजनांची कामेच सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे संकेत मागील महिन्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते.
एकाच वेळी अनेक नळपाणी योजनांच्या कामांचे ठेके घेणाऱ्या ठेकेदारांच्या मोनोपोली यामुळे कर्जत तालुक्यातील अनेक नळपाणी योजना यांची कामे सुरू झालेली नाहीत. त्यात तालुक्यात नऊ नळपाणी योजना यांची कामे शून्य टक्के झाली होती. त्यामुळे त्या योजनांबद्दल जिल्हा परिषद नाराज होती. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्जत तालुक्यातील जांभिवली, डोणे आणि तिवरे या जल जीवन मिशन मधून मंजुरी देण्यात आलेल्या योजनांचे ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याचा निर्णय रायगड जिल्हा परिषदेने घेतला. त्यातील दोन नळपाणी योजनांची कामे एकाच ठेकेदार कंपनीचे नावे आहेत. मात्र मुख्य कार्यकाऱ्यांच्या या भूमिकेने ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे अधिकारी मात्र चांगलेच धास्तावले आहेत.
Be First to Comment