शिहू नागोठणे पोयनाड मार्गाची दुर्दशा कायम : रुग्ण, गर्भवती महिलांसह प्रवाशांचे हाल
सिटी बेल लाइव्ह / पाली-बेणसे (धम्मशिल सावंत)-
शिहू नागोठणे पोयनाड या वहातुक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मार्गाची मागील पाच वर्षापासून प्रचंड दुर्दशा झाली आहे. जिल्ह्यातील खराब रस्ते पुन्हा पुन्हा दुरुस्त होत आहेत. मात्र शिहू नागोठणे रस्त्याने जणू काय घोडे मारले आहे, हे समजणे उमजने कठीण झाले आहे.
या मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेक निवेदने व आंदोलने झाली, मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अंतर्गत राजकारण होत असल्याने वर्षानुवर्षे हा रस्ता नादुरुस्त राहिला असल्याची नाराजी जन माणसातून व्यक्त होत आहे. आमदार बदलले, खासदार बदलले मात्र या मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण होत नसल्याने प्रशासनासोबत आता लोकप्रतिनिधी बाबत देखील नाराजी व्यक्त होत आहे. वर्षाचे बारा महिने हा रस्ता खड्यात हरवला आहे. त्यामुळे नागोठणे मार्गाला वाली कोण? असा सवाल जनतेतून उपस्थीत केला जात आहे.
कोणत्याही गोष्टीच्या सहनशीलतेची सीमा असते. मात्र आता हे सारं सहन शक्ती पलिकडे गेले असल्याचा संताप प्रवशी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे. महिला व वृध्द प्रवाशी प्रशासनाच्या गलिच्छ कारभारावर शिव्यांची लाखोली वाहत आहेत.रोज मरे त्याला कोण रडे, शिहू नागोठणे जीवघेण्या रस्त्याचा वनवास कधी संपणार? असा सवाल आता जनता विचारत आहे.
यापूर्वीच्या आमदार व खासदारांनी या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. जनतेने देखील मतदार संघाचे नेतृत्वात बदल करून आमदार म्हणून रविशेठ पाटील यांना संधी दिली तर खासदार म्हणून सुनिल तटकरे यांना संधी दिली. मात्र प्रश्न हा आहे की नवे आमदार व खासदार या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात यशस्वी होणार की जनतेला या मरणयातना कायम सोसाव्या लागणार. रस्त्याच्या दुरावस्तेकडे बांधकाम विभाग, लोकप्रतीनिधी व स्थानिक पुढार्यांची उदासिनता यामुळे शिहू नागोठणे मार्गाची परिस्थीती काही केल्या सुधारत नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
या मतदारसंघाचे आमदार व खासदार यांनीच या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे. शिहू नागोठणे जिवघेण्या मार्गाच्या डांबरीकरणाचा प्रश्न निवडणुकांपुर्वी निकाली निघाला नाही तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा संतप्त महिला, युवक व नागरीकांनी दिला आहे. सदर मार्ग सुस्थीतीत यावा याकरीता शासन प्रशासनासह लोकप्रतिनीधिंची देखील उदासिनता सातत्याने दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे काम मार्गी लागेल अशा भ्रमात असलेल्या नागरीक जनतेच्या हातावर पुन्हा एकदा तुरी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मार्गावरुन नियमीत प्रवास करणारे प्रवाशी, वाहनचालक व स्थानिक नागरीकांमधून विचारला जात आहे. अनेकदा तक्रारी अर्जाबरोबरच विवीध प्रकारची आंदोलने करुन देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या मार्गावरील वाळू, खडी व दगडगोट्यांमुळे वाहने चालवने अत्यंत कठीण व खडतर होवून बसले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुरळा उडत असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची परिस्थीती दिसून येत आहे.
या मार्गावरुन अवजड वाहतूकीचे प्रमाण देखील वाढले आहे. या मार्गावर अपघाती घटनांतही वाढ झाल्याची परिस्थीती दिसून येत आहे. मार्गावरील खड्डे बुजविण्याचा केवळ फार्स केला जातो. परंतू दोन दिवसातच रस्त्याची परिस्तीती जैसे थे होते. शिहू नागोठणे मार्ग डांबरीकरणास निधी उपलब्द झाला आहे दिवाळीनंतर काम सुरु होईल अशा सातत्याने बतावण्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने केल्या जातात. परंतू त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. या मार्गावरील खड्डे, दगडगोटे, खाचखळगे आदींमुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक व जिवघेणा बनला आहे. या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवाशी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अक्षरशः जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील रिट व खडीमुळे मोटारसायकलस्वार कोसळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशातच खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने खड्डा चुकविताना एक वाहन दुसर्या वाहनावर आदळून अपघात होण्याच्या घटना पहावयांस मिळत आहेत.
या मार्गावरुन प्रवास करताना प्रवाशी, रुग्न, विद्यार्थी, कामगार वर्ग आदी सार्यांनाच जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या मार्गाला कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने नाईलाजास्तव कमरेची हाडे खिळखिळी होवून मान मणक्याचे आजार उद्भवले तरी या एकमेव असलेल्या जिवघेण्या मार्गावरुनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनांमध्ये सातत्याने बिघाड होत आहेत. व वाहनचालकांच्या खिशाला नाहक कात्री बसत आहे. या मार्गावरुन प्रवास करणार्या गर्भवती महिला, रुग्नांचे तर अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे कुणाचे अच्छे दिन येवो न येवो पण शिहू नागोठणे मार्गावरील प्रवाशांना अच्छे दिन कधी येणार? या मार्गाचे डांबरीकरण कधी होणार असा सवाल नागरीकांमधून उपस्थीत होत आहे.
शिहू नागोठणे मार्गावर लहान मोठ्या वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. अशातच या मार्गावरील खड्डे व दगडगोट्यांनी हा मार्ग अत्यंत धोकादायक व जिवघेणा बनला आहे. या मार्गावरुन नागरीकांसह, कामगार, विद्यार्थी, रुग्न, आबालवृध्द यांची सततची येजा सुरु असते. हा मार्ग सुस्थितीत यावा याकरिता सर्वपक्षीय आंदोलन केले होते. मात्र यावेळी केवळ वेळकाढूपणा ची भूमिका प्रशासनाने घेतली. सद्यस्थितीत या मार्गावरुन मार्ग अधिकच धोकादायक बनला असून अशा खडतर मार्गावरुन वाहन कसे चालवावे असा प्रश्न वाहनचालकांसमोर पडला आहे. या मार्गावर अनेकदा अपघात होउन निष्पाप जिवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रवाशी वर्गाला देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची गांभीर्याने दखल घेवून रस्ता सुस्तीतीत आणण्याकरीता ठोस व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
अॅड.विजयपाल सावंत, नियमित प्रवाशी






Be First to Comment