Press "Enter" to skip to content

हनुमान जयंती विशेष… .

सिटीबेल आपल्या वाचकांसाठी श्री हनुमंतांच्या जयंतीच्या औचीत्यानें विशेष लेख सादर करत आहे…

सर्व देवतांमध्ये हनुमान देखील एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता आहे. हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या विविध संकटांपासून हनुमान मुक्ती देतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही, तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली आपल्याला महाभारतातील लेखात कळते. त्यानंतर कलियुगातही हनुमान संकटांपासून पृथ्वीचे तसेच मानवी जीवनाचे रक्षण करतो.

प्रभू श्रीराम यांचा निष्ठावान सेवक,भक्तम्हणून हनुमान आपल्या सर्वाना परिचित आहे. हनुमानाची असीम भक्ती,अफाट शक्ती आणि असिम विनम्रता अशा अनेक गुणांसाठी ओळखले जातात. हनुमानाच्या जन्माची कथा ही श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे बरे का ? हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून शंकर महादेवाची पूजा करत होती.आजही शिवभक्त महाशिवरात्रीला शंकराची उपासना करतात असो….याच दरम्यान अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या देखील आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची आराधना करत होत्या. त्यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अपत्य प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाचा समपन प्रसाद म्हणून त्यांनी तिन्ही राण्यांना देवाकडून फळ मिळाले ते देऊ केले. राणी कैकयीच्या हाती आलेले फळ एक पक्षी घेऊन पळाला. पण उडताना तिच्या हातून ते दिव्य चमत्कारी फळ खाली पडले. हेच फळ वाऱ्याने पक्ष्याच्या चोचितून अंजनीच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाच्या कृपा प्रसाद म्हणून ग्रहण केले.

सुमित्रा राणीने आपले अर्धे फळ सोबत वाटून खाले. त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येच्या तिन्ही राण्याना आणि एकडेअंजनी या सर्वांना मुले झाली. केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला तो अतिशय ईश्वरी अवतार वाटत होता. त्यांनी त्याचे नाव मारुती म्हणजे वारा किंवा वायू. वाऱ्यामुळे म्हणजेच वायू देवांमुळे त्या देवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले. त्यामुळे मारुतीला वायुपुत्र हे नाव ठेवले. शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार म्हणजे शंकराचा अवतार असल्याची ही श्रद्धा आहे.

हनुमान अत्यंत शक्तिशाली होता. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्य बिंब पाहून मारुतीला तो सुंदर चेंडू वाटला. आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. आता या सृष्टीचे कसे होणार ?म्हणून हनुमान देवाला अडवायला देवांचा राजा इंद्र आडवा झाला.त्यासाठी इंद्राने आपले वज्र वापरावे लागले. हा वज्रप्रहार मारुतीच्या हनुवतिला लागला.आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमानअसेही पडले.

मारुतीची अनेक नावे आहेत. आहेत केसरीचा मुलगा म्हणून केसरीनंदन म्हणून देखील मारुतीला ओळखले जाते.अंजनी चा मुलगा असल्यामुळे अंजनेय किंवा अंजणीपुत्र . वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र. बजरंग हनुमंत या नावाने देखील मारुतीला ओळखले जाते.
हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बल देवता मानले जाते जेव्हा मुघल भारतात येऊन इथल्या हिंदू जनतेवर अन्याय नि अत्याचार करत होते तेव्हा हिंदूंमध्ये त्यांच्याशी लढण्याचे सामर्थ्य यावे म्हणून समर्थ रामदासांनी हनुमानाच्या म्हणजेच बलाच्या उपासनेला प्रोत्साहन दिले. संत रामदास यांनी विविध ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आजही कुस्तीच्या आखाड्यांमध्ये हनुमानाला वंदन करूनच पाहिलवाण कुस्ती खेळतात.चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा होतो. हनुमानाच्या मंदिरांमध्ये खूप मोठा उतस्व साजरा केला जातो. आजच्या तरुण मुलांनी या हनुमान जन्म कथेच्या माध्यमातून बोध घेऊन आपल्या जीवनात व्यायामाचे किती महत्त्व आहे हे ओळखले तरी खूप झाले. ही हनुमान जन्माची तथा मारुती जन्माची कथा घराघरात पोहोचवून आपण यावर्षी हनुमान जयंती साजरी करूया.

चौकट

हनुमान जयंतीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यांच्या मागे संकटे किंवा साडेसाती असणाऱ्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते. असे अनेक कारणे आपल्याला दिसून येतात. हनुमान चालिसा म्हणणाऱ्याना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते. साडे साती असतांना दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी व शनिवारी मारूतीचे दर्शन घ्यावे. हनुमंत चिरंजीवी असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची भाविकांमधे मान्यता आहे. हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जात असून भाविक त्या शेंदुराला आपल्या मस्तकावर धारण करतात.तसेच शरीर सौष्ठव कमविण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमंताची आराधना करावी असे मानले जाते. हनुमंतामध्ये बलतत्वाचा संचार असल्याने स्त्रियांनी त्याचे दर्शन दुरून घ्यावे अशी देखील एक मान्यता आहे. हिंदु मान्यतेनुसार हनुमंताला शक्ति स्फुर्ति आणि ऊर्जेचे प्रतिक मानले जाते. सर्व संकटाचे निवारण करण्याची क्षमता हनुमंता मध्ये आहे. समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रभर मारूती रायाच्या मुर्तींची स्थापना केली आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, “सर्वात वेगवान मनुष्याचे मन आहे आणि मनाला पकडण्याचे सामर्थ्य केवळ हनुमानातच आहे.”



चौकट

अनेक भाविकांच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न होत असेल की हनुमंताच्या मूर्तीला शेंदूर का बरे फसतात?
ती एक मोठी गमतीशीर कहाणी आहे. लंका नरेश रावणाचे सोबत युद्ध जिंकल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी त्याचा बंधू विभीषण यास लंकेचा राजा बनविले. सीतामाईंना सोबत घेऊन प्रभू रामचंद्र आयोध्या नगरीत आले. अयोध्येच्या सिंहासनावर यापूर्वीच त्यांच्या पादुका विराजमान झालेल्या होत्या. अत्यंत प्रसन्नतेचे आत्यानंदाचे असे ते दिवस होते. अगदी रात्री रात्रीपर्यंत प्रभू श्री रामचंद्रांच्या दालनात आप्तेष्टांचा गराडा पडलेला असे… वनवासातील, लंका चढाईच्या, समुद्रधुनी लांघण्याच्या कथांची तर आवर्तने सुरू असत.. अशा त्या भरलेल्या दिवसात रात्री सगळे आपआपल्या दालनात निघून जात. हनुमंत मात्र श्री प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याचे उद्देशाने तेथेच बसून राहत. लक्ष्मणापासून प्रत्येकाने त्यांना समजावून सांगितले की रात्री राजा आणि राणी एवढे दोघांनी दालनात निजायचे असते. श्रीराम भक्ती मध्ये रमान मारुती त्यावेळी अत्यंत निरागसपणे व्यक्तिवाद करत पण राजांच्या सोबत सीतामाई कशा काय निजतात? हसू अनावर झालेल्या लक्ष्मणाने हनुमंताला म्हटले की हा प्रश्न तू प्रभू श्री रामचंद्रांनाच विचार. भोळ्या स्वभावाच्या हनुमंताने हा प्रश्न प्रभुंना विचारला सुद्धा. मंदस्मित करत प्रभू विचार करू लागले याला काय बरे उत्तर द्यावे? तेवढेच म्हणाले की अरे त्या सीतेच्या भांगेमध्ये मी शेंदूर भरले आहे ना म्हणून ती माझ्यासोबत निजत असते तुझ्या भांगे मध्ये मी कुठे शेंदूर भरले आहे? दुसऱ्या दिवशी संबंध अंगाला शेंदूर फासून हनुमंत श्रीरामांसमोर प्रकट झाले. हनुमंताने सांगितले घ्या तुम्हाला शेंदूर आवडते ना म्हणून मी पूर्ण अंगभर शेंदूर चोपडले आहे आता मला तुमच्या दालनातून कोणीही काढू शकणार नाही.. स्वार्थहीण भक्ती काय असते हे प्रभू श्री रामचंद्रांनी सगळ्यांना पटवून दिले, हनुमानाची समजूत काढली, आणि म्हणाले की माझ्या दालनातच नाही,तर लोकांच्या हृदयातून सुद्धा कोणीही तुला काढू शकणार नाही.जो जो तुझ्या अंगावर असा शेंदूर लावेल त्याच्या मनात तुझा वास असेल.

सिटी बेल अलर्ट :-
सिटीबेल न्यूज पोर्टल वरील लिखाण, व्हिडिओ,फोटो पुनर्वापरापूर्वी समूह संपादकांची संमती आवश्यक…. अनुमती विना पूर्ण अथवा अंशतः मजकूर, फोटो व्हिडिओ पुनरप्रकाशित केल्यास कंटेंट प्रायव्हसी अँड सिक्युरिटी ॲक्टअनुसार कारवाई करण्यात येईल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.